महाराष्ट्र केसरी स्पर्धेला मिळाला ग्रीन सिग्नल

मतीन शेख
Friday, 8 January 2021

महाराष्ट्र केसरी २०२०-२०२१ ला महाराष्ट्र शासनाची सर्व कोरोना संबधीत शासकीय आदेशाचे पालन करून परवानगी मिळाली आहे

कोल्हापूर : कोरोना महामारीत महाराष्ट्राच्या तांबड्या मातीतील रांगड्या मल्लांचा शड्डू थांबला.परंतू मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने तो शड्डू परत घुमणार का याकडे पैलवान मंडळी व कुस्ती शौकींच्या नजरा लागल्या होत्या.राज्य शासनाकडे कुस्ती स्पर्धेच्या आयोजना संदर्भात राज्य कुस्तीगीर परिषद पाठपुरावा करत होती.या पाठपुराव्यास यश मिळाले आहे.

महाराष्ट्र केसरी २०२०-२०२१ ला महाराष्ट्र शासनाची सर्व कोरोना संबधीत शासकीय आदेशाचे पालन करून परवानगी मिळाली आहे .महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार  , क्रीडामंत्री सुनिल केदार व क्रीडा आयुक्त डॉ. ओमप्रकाश बखोरिया यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजना संदर्भात हिरवा कंदिल दाखवला आहे.

हेही वाचा- निवडणुकीमुळे गडहिंग्लजला अर्धा कोटींची वसुली -

शासनाची परवानगी मिळल्याने परिषद स्पर्धा आयोजनासाठी सज्ज झाली आहे.१७ जानेवारी ला कुस्ती परिषदेच्या कार्यकारणीच्या सभेत आयोजनाच्या तारखे संदर्भात निर्णय होणार आहे.महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आकर्षण अधिक असल्याने  स्पर्धा पाहण्यासाठी राज्य भरातून प्रेक्षक वर्ग दाखल होत असतो.परंतू कोरोनाचे संकट लक्षात घेता समुहाने एकत्र येणे शक्य नाही. तरी मोजक्या यंत्रणेसह पुण्यातील बालेवाडीच्या बंदिस्त क्रिडा संकुलात या स्पर्धेचे आयोजन करण्याचा विचार परिषदेचा आहे.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra kesari competition permission