esakal | एकेकाळी वर्चस्व गाजविणारा महाराष्ट्राचा फुटबॉल संघ यंदाही आयलीगमध्ये नाहीच

बोलून बातमी शोधा

Maharashtra Is Not In The I-League Competition Kolhapur Marathi News

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) नव्या आयलीग संघासाठी अर्ज मागविले होते. यात दिल्लीच्या सुदेवा एफसी, विशाखापट्टणमच्या श्रीनिधी एफसी आणि शिलॉंगच्या रिनीथ स्पोर्टस क्‍लब यांनीच अर्ज सादर केले आहेत.

एकेकाळी वर्चस्व गाजविणारा महाराष्ट्राचा फुटबॉल संघ यंदाही आयलीगमध्ये नाहीच
sakal_logo
By
दीपक कुपन्नावर

गडहिंग्लज : अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) नव्या आयलीग संघासाठी अर्ज मागविले होते. यात दिल्लीच्या सुदेवा एफसी, विशाखापट्टणमच्या श्रीनिधी एफसी आणि शिलॉंगच्या रिनीथ स्पोर्टस क्‍लब यांनीच अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे आयलीग स्पर्धेत यंदाही महाराष्ट्राचा संघ दिसणार नाही. परिणामी, एकेकाळी या स्पर्धेमध्ये वर्चस्व गाजविणाऱ्या महाराष्ट्राच्या फुटबॉलपट्टूंना संघासाठी वणवण करावी लागणार आहे. 

गत हंगामातील आयलीग विजेता कोलकत्याचा मोहन बागान संघ इंडियन सुपरलीगमधील (आयएसएल) एटीके संघात विलिन झाला आहे. त्यामुळे आयलीग संघांची संख्या दहावर घसरली. यासाठीच एआयएफएफने आयलीगसाठी संघांना प्रोत्साहन मिळावे म्हणून नव्या कार्पोरेट संघासाठी अर्ज मागविले होते.

सध्या आयलीग आणि आयएसएल संघ नसणाऱ्या केंद्रांना प्रोत्साहन देण्याचे धोरणामुळे न्यू दिल्ली, रांची, जयपूर, जोधपूर, भोपाळ, लखनौ आणि अहमदाबाद या शहरातील संघांना प्राधान्य असल्याचे नमुद केले होते. यापूर्वी बंगळूरच्या जिंदाल समुहाच्या बेंगळुरू एफसी (सन 2013) पुण्याच्या कल्याणी ग्रूपच्या भारत एफसी (2015) व डीएसके शिवाजीयन्स (2014), चेन्नई सीटीएफसी (2016), केरळचा गोकुलम एफसी (2017) यांना थेट प्रथम श्रेणी आयलीगमध्ये संधी देण्यात आली. 

एआयएफएफचे मुख्यालय असणाऱ्या दिल्लीत एकही आयएसएल आणि आयलीगचा संघ नसल्याने राष्ट्रीय फुटबॉलपासून हे केंद्र वंचीत आहे. त्यामुळेच या केंद्रात सुदेवा एफसीला अधिक संधी मानली जाते. हैद्राबादचा श्रीनिधी एफसी हा संघही दावेदार मानला जातो. हैद्राबादमध्ये आयएसएल संघ असल्याने श्रीनिधी एफसीने आपले मुख्यालय आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम दाखविले आहे. या संघाची स्वतःची चार सुसज्ज मैदाने आहेत. ईशान्येकडील शिलॉंगच्या रैनित स्पोर्टस क्‍लबने देखील यासाठी शड्डू ठोकला आहे. 

महाराष्ट्राने आयलीगमध्ये तडफदार कामगिरी केली आहे. मुंबईच्या महिंद्रा युनायटेडने बलाढ्य संघांना धूळ चारीत 2006 ला राष्ट्रीय फुटबॉल साखळीचे विजेतेपद पटकाविले होते. मुंबईच्याच एअर इंडिया आणि ओनजीसी संघाने देखील ठसा उमठविला आहे. मुंबई एफसीने द्वितीय श्रेणी आयलीगचे विजेतेपद पद पटकाविले होते.

केंकरे एफसी आणि पिफा कुलाबा या संघाने द्वितीय श्रेणी स्पर्धेत प्रतिनिधीत्व केले आहे. या संघातून महाराष्ट्राच्या शेकडो खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी घेतली. आता मात्र आयलीग संघच नसल्याने महाराष्ट्राच्या प्रतिभेला पदार्पणासाठी वणवण करावी लागणार आहे. 

खेळाडूंना संघर्ष करावा लागणार
आयलीगमध्ये महाराष्ट्राचा संघ नसने दूर्दैवाचे आहे. सर्वच व्यावसायिक संघ स्थानिक पाठिंबा मिळावा यासाठी आपल्याच परिसरातील खेळाडूंना प्राधान्य देत आहेत. त्यामुळेच महाराष्ट्राच्या खेळाडूंना एंट्री मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. 
- सुखदेव पाटील, आंतरराष्ट्रीय फुटबॉलपट्टू