हर हर हर महादेवच्या गजरात महाशिवरात्र

Mahashivaratri in Gajar of Har Har Har Mahadev
Mahashivaratri in Gajar of Har Har Har Mahadev

कोल्हापूर : कैलासराणा शिव चंद्रमौळी, फणींद्र माथा मुकुटीं झळाळी, कारुण्यसिंधू भवदुःखहारी, तुजवीण शंभो मज कोण तारी, श्री पावर्ततपते हर हर हर हर महादेवऽऽऽऽचा गजर करत शिवरात्रौत्सव शहर परिसरातील विविध शिवमंदिरात साजरा झाला. शिवसहस्त्र नामावली, शिवस्तुती अन्‌ शिवलीलामृत पारायण, भजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रम झाले. उद्या (ता. 22) अनेक शिवमंदिरात महाप्रसादाचे आयोजन केले आहे. 

माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र म्हणतात. माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात. महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा झाली. पंचगव्य म्हणजे, गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक केला. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप दिला. नंतर धोत्रा, बेलाची पाने, काही धान्ये, पांढरी फुले वाहून पूजा केली. महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविकांनी उपवास केला. काहीजणांनी दूध, फळे, राजीगरा लाडू, चिक्की, खिचडी असा आहार घेतला. 

मंगळवार पेठेतील श्री रावणेश्‍वर मंदिराचे पुजारी अशोक भोरे म्हणाले, ""सकाळी सहा ते नऊ वेळेत लघुरुद्र महाभिषेक झाला. आरती झाली. दिवसभर प्रसादाचे वाटप केले. सकाळपासून मंदिरासमोर भावगीते, भक्तीगीते गायिली. अभंगवाणी, भजने ही म्हटली.'' 

शुक्रवार पेठेतील सोमेश्‍वर गल्ली येथील सोमेश्‍वर तरुण मंडळातर्फे शिवपूजन झाले. शिवमंदिरात शिवाची पूजा ही रामेश्‍वरम्‌ येथील समुद्र किनाऱ्यावर भगवान श्रीराम, लक्ष्मण यांनी स्वत: शिवलिंग ज्योतिर्लिंगाची स्थापना केली, या रुपात बांधली होती. उत्तरेश्‍वर पेठेतील श्री उत्तरेश्‍वर मंदिरात दिवसभर भाविकांनी दर्शन घेतले.'' शिवमंदिराबरोबर अनेकांनी पहाटे उठून शिवाभिषेक केला. यासाठी पारद, तांब्याच्या धातूची पिंडी पुजेसाठी वापरली. 

विशेष म्हणजे, काहींनी तर मातीची शिवपिंडी तयार करुन त्यावर ही पूजन केले. श्री कपिलेश्‍वर, महापालिकेच्या मागील बाजूस श्री रोहिडेश्‍वर, मटण मार्केटच्या बाजूला शिवमंदिर, एसटी स्टॅंडच्या बाजूला श्री वटेश्‍वर, श्री अंबाबाई मंदिरातील श्री काशीविश्‍वेवर, श्री जोतीबा मंदिराच्या मागील बाजूचे शिवमंदिर, कसबा बावड्यातील रणदिवे गल्लीतील शिवमंदिर, उपनगरातील शिवमंदिरे, वांगी बोळ येथील देव हुतीश्‍वर महादेव, भवानी शंकर महादेव, लक्षतीर्थ वसाहत येथील महादेव, वांगी बोळातील कर्दमेश्‍वर महादेव, रंकाळा येथील नंदी मंदिर, शिवाजी पेठेतील नाथपंथी देवस्थान, मंगळवार पेठेतील श्री कैलासगडची स्वारी, मंगळवार पेठ पशुचिकित्सालयाच्या बाजूचे शिवमंदिर, हुतात्मा पार्कमधील शिवमंदिर, पंचगंगा नदीकाठावरील अन्‌ पंचगंगा स्मशानभूमी येथील सर्व शिवमंदिरे, कसबा बावड्यातील नवनाथ मंदिर, निवृत्ती चौकातील शिवमंदिर, अतिरुद्रेश्‍वर, ओढ्यावरील गणेश मंदिरातील शिवमंदिर, श्री दत्तभिक्षालिंग येथील शिवमंदिर, श्री ऋणमुक्‍तेश्‍वर, बापट कॅम्पयेथील ओंकारेश्‍वर मंदिर आदी ठिकाणी भाविकांनी दर्शन घेतले. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com