पती-पत्नी गडहिंग्लज पालिकेचे "कारभारी'

अजित माद्याळे
Wednesday, 14 October 2020

पालिकेच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष या दोन्ही प्रमुख पदावर पहिल्यांदाच पती-पत्नी विराजमान झाले आहेत. थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षा स्वाती कोरी आणि आज उपनगराध्यक्ष पदावर निवडून आलेले महेश कोरी यांच्या माध्यमातून घडून आलेला हा योग पालिकेच्या इतिहासात ठळक नोंद करण्यासारखा आहे. 

गडहिंग्लज : पालिकेच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष या दोन्ही प्रमुख पदावर पहिल्यांदाच पती-पत्नी विराजमान झाले आहेत. थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षा स्वाती कोरी आणि आज उपनगराध्यक्ष पदावर निवडून आलेले महेश कोरी यांच्या माध्यमातून घडून आलेला हा योग पालिकेच्या इतिहासात ठळक नोंद करण्यासारखा आहे. 

जनता दलाचे नेते ऍड. श्रीपतराव शिंदे यांच्या सौ. कोरी कन्या होय. उच्च शिक्षित स्वाती यांनी 2006 च्या पालिका निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणाचा श्रीगणेशा केला. निवडून आल्यानंतर त्यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली. साधना कनिष्ठ महाविद्यालयात त्या प्राध्यापिकाही आहेत. 2016 मधील निवडणुकीत नगराध्यक्षपद थेट जनतेतून निवडायचे ठरले. त्यावेळी जनता दलाकडून सौ. कोरी रिंगणात उतरून विजयीही झाल्या.

दरम्यान, हद्दवाढ झाल्यानंतर निर्माण झालेल्या नव्या प्रभागातून पती महेश कोरी यांना जनता दलाची उमेदवारी मिळाली. वाढीव हद्दीतून श्री. कोरी निवडून आले. त्यामुळे नगराध्यक्ष पदावर पत्नी आणि सभागृहातील सदस्य म्हणून श्री. कोरी कार्यरत राहिले. 

उपनगराध्यक्षा शकुंतला हातरोटे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर श्री. कोरी यांना संधी देण्यात आली. आज झालेल्या मतदानात ते विजयी झाले. यामुळे पत्नी सौ. स्वाती आणि पती महेश या दाम्पत्यांकडे पालिकेच्या प्रमुख दोन पदांची सूत्रे आली आहेत. पालिकेच्या इतिहासात असा योगायोग पहिल्यांदाच घडल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी मंजूषा कदम नगराध्यक्ष असताना त्यांचे पती किरण कदम सभागृहात नगरसेवक म्हणून कार्यरत होते. परंतु, पती-पत्नी एकाचवेळी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदावर विराजमान होण्याचा योग सौ. व श्री. कोरी यांच्या माध्यमातून आज घडून आला आहे. 

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahesh Kori As Gadhinglaj Deputy Mayor Kolhapur Marathi News