Diwali Festival 2020 : हॅप्पी दिवाळी, हेल्दी दिवाळी! दीपोत्सवाच्या आनंदपर्वातील आज मुख्य दिवस

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 November 2020

बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी झाली. 

कोल्हापूर: ‘जाळे तुटता अंधाराचे- तेजोमय सांज-दीपांचे-धरतीवरती येणे नक्षत्रांचे,’ असे आनंदाचे गीत गात घराघरांत दिवाळीचे जोरदार स्वागत झाले आहे. उद्या (शनिवारी) दीपोत्सवातील मुख्य दिवस असून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘हॅप्पी दिवाळी, हेल्दी दिवाळी’ अशा शुभेच्छांच्या वर्षावाला आता प्रारंभ झाला आहे. चैतन्यदायी वातावरणात सर्वत्र मांगल्य आणि समृद्धीचा हा सण साजरा होत असून आजही बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी झाली. 

दरम्यान, धनत्रयोदशीनिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन झाले. वैद्यकीय व्यावसायिकांतर्फे धन्वंतरी पूजन झाले. कोरोनामुळे यंदा दिवाळी पहाट कार्यक्रमही जाहीरपणे 
होणार नसले तरी ऑनलाईन उपक्रमांचे आयोजन काही संस्थांनी केले आहे. कोरोना लॉकडाउननंतर अर्थचक्र आता गतीमान होवू लागले आहे. त्यामुळे लॉकडाउन काळातील कटु आठवणींना तिलांजली देत यंदाचा दीपोत्सव साजरा होत आहे. त्यात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांवर अधिक भर आहे. मोठ्या आवाजाच्या फटाक्‍यांनाही फाटा देत हरित फटाक्‍यांवर भर दिला जाणार आहे.  

उद्या दिवाळीचा मुख्य दिवस असून आज रात्रीपासूनच आकाशकंदिलाच्या लख्ख प्रकाशाच्या साक्षीने दारात सडा टाकून आकर्षक रांगोळ्या सजू लागल्या. पहाटे अभ्यंग स्नान होईल आणि त्यानंतर सहकुटुंब फराळाचा आस्वाद घेतला जाईल. 
दुपारी दोन वाजून १८ मिनिटांनी आमावस्येला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे दुपारनंतर सर्वत्र लक्ष्मी-कुबेर पूजनाच्या तयारीला प्रारंभ होईल आणि सायंकाळी पाच वाजून ५८ मिनिटांपासून रात्री आठ वाजून ३२ मिनिटांपर्यंत विधीवत पूजा होईल. यानिमित्ताने कुटुंबातील सर्वच सदस्य एकवटतील आणि ‘हे वर्ष सुख-समृद्धी, आर्थिक भरभराटीचे व आरोग्यदायी जावो’ अशा प्रार्थनेबरोबरच लक्ष-लक्ष दिव्यांच्या तेजोमय प्रकाशात सारा आसमंत उजळून निघेल. सोमवारी (ता.१६) दिवाळी पाडवा आणि भाऊ-बहिणीतील नात्यांची अलवार वीण घट्ट करणारा भाऊबीजेचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होईल.

हेही वाचा- भावा... फटाके वाजवाचे नाहीत तर फटाके खायचे!

 

जपूया सामाजिक भान
कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता असून त्यादृष्टीने प्रशासन तयारीत आहे. या पार्श्‍वभूमीवर यंदाची दिवाळी प्रदूषणमुक्त करण्याची भूमिका ‘सकाळ’ने मांडली आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. विविध संस्था, संघटनांनीही सक्रिय पुढाकार घेतला आहे. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर फटाक्‍यांची आतषबाजी होते. मात्र, यानिमित्तानेही सामाजिक भान जपत बहुतांश व्यापाऱ्यांनी फटाक्‍यांना फाटा देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वच घटकांनी आरोग्यदायी व पर्यावरणपूरक दीपोत्सव साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

संपादन- अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: main day of Dipotsavi rush for shopping in the market