पौराणिक वारसा लाभलेल्या मालेत रामफळ वृक्षांची जपणूक आवश्यक; गुणकारी हे फळ होतेय दुर्मिळ   

अनिल मोरे 
Friday, 2 October 2020

प्राचीन काळापासून इथे रामनवमीला हनुमानाची "लंका-यात्रा" भरते.

बोरपाडळे (कोल्हापूर) : पन्हाळा तालुक्यातील माले हे परिसरातील शेतीच्या हरितक्रांतीसाठी प्रसिद्ध आहे.येथील कै.बापूसाहेब जमदाडे यांनी जयभवानी पाणी पुरवठा योजना स्थापनेने मालेसह परिसर हिरवागार केला.समृद्धतेची निर्मिती करणाऱ्या मालेला एक वेगळा पौराणिक ढंग लाभला आहे. प्राचीन काळापासून इथे रामनवमीला हनुमानाची "लंका-यात्रा" भरते.याचदिवशी हनुमानाची मोठ्या मूर्तीची भव्य मिरवणूक निघते.येथील भवानी मंदिरात छत्रपती शिवराय-संभाजीराजांची भेट झाल्याची इतिहासात नोंद आहे.हनुमान मंदिर व मस्जिद समोरासमोर असून शहापूरजवळील गावसीमेवर हजरत मलिक रिहान विशाळगडबाबा पिराचा ऊरूस सर्व धर्माचे लोक साजरा करतात.

पश्चिमेकडील सध्याच्या ओढ्याला पूर्वी हैमावती नदी नाव असल्याचे "केदारमहात्म्य व करवीरमहात्म्य" या ग्रंथात उल्लेख आढळतो.या नदीकाठी महामृत्युंजय मंत्र लिहिणाऱ्या मार्कंडेय ऋषींनी तपश्चर्या केल्याची नोंद आढळते.इथे साजरी होणारी रामनवमी दिवशीची ग्रामदैवत हनुमानाची "लंका-यात्रा" येथील रामभक्तीची प्रचिती देते.शिवाय पूर्वी या गावात रामफळचे उत्पन्न खूप निघायचे.इथे असणा-या रामफळ झाडांचे अस्तित्व आणि महात्म्य बऱ्यापैकी लोकांना माहितच नसल्याचे दिसते.येथील रामफळ म्हणजे येथील पुरातन भक्तिमय वातावरणाचा एक भाग जाणवतो.फार पूर्वीपासून असणारी रामफळाची झाडे नव्या पिढीला आणि धार्मिक लोकांना संशोधनाचा विषय बनू पाहतोय.

हेही वाचा- कोल्हापुरात मालिकांसह चित्रपटांच्या शूटिंगचा श्रीगणेशा : ग्रामीण भागातही संधी -

गेल्या पंधरा-वीस वर्षापूर्वी माले-शहापूर रस्त्यावर सुमारे एक किलोमीटर अंतरावर रामफळीची अनेक झाडे होती.झाडांनी गजबजलेल्या रस्त्यावर वाटसरूला हिरवीगार गडद सावली मिळायची.गावात प्रवेश करताना एक सुखद गारव्याची अनुभूती मिळायची.माले गावाची ती एक वेगळी खासियत वाटायची.रामफळीचा येथील भक्तिमय धार्मिक वातावरणाशी काहीतरी सुसंबध असायाला हवा,असे येथील बुजुर्गांचे म्हणणे आहे.सध्या अजूनही शहापूर ते माले आणि केखले ते माले रस्त्यावर तुरळक प्रमाणात झाडे आहेत.पूर्वीपासून गावाच्या चोहोबाजूच्या रस्त्यांना तर झाडे असायची शिवाय शेतकऱ्यांच्या बांधावरही होती.अलीकडे शेतीच्या बांधावरही हाताच्या बोटावर मोजण्याइतपत असून मारुती ज्ञानू पाटील सारखे काही शेतकरी अजूनही बाजारात किरकोळ विक्री करण्याइतकी उत्पन्न घेत आहेत.
हेही वाचा- Video : महात्मा गांधी जयंती विशेष ; पर्यावरणपूरकतेमुळे खादीकडे वाढला कल -

मालेपासून शहापूर,केखले,वाघबीळ तसेच कोडोलीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा रामफळीची भरपूर झाडे होती,अजूनही काही प्रमाणात त्यांचे अस्तित्व आहे.तसेच पन्हाळा तालुक्यातील असे एकमेव गाव असल्याचे येथील ज्येष्ठनागरिक सदाभाऊ सोळसे यांनी सांगितले.रामफळीचे गोड रसाळ फळ शरीरात गारवा,पचनशक्ती वाढवून पोटातील कृमी नष्ट करणारे आहे.त्यामुळे येथील पदाधिकारी,तरुणमंडळे,युवावर्ग,सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने,कृषी विभागाच्या सहकार्याने रामफळ वृक्षारोपण-संगोपनाची तसेच पूर्वापार गावाच्या चारी बाजूच्या रस्त्याला असणाऱ्या रामफळ झाडाची संस्कृती जपण्याची गरज जाणवते.

 रामफळ खाण्याचे फायदे 
  रामफळने रोगप्रतिकारशक्ती वाढवते.यातील विटमिन 'सी'मुळे शरीर निरोगी राहते शिवाय रक्तप्रवाह सुरळीत होतो,हृदय व रक्तवाहिन्या संदर्भात समस्या दूर करते.उच्य रक्तदाब नियंत्रित करते.मुतखडा त्रास कमी करते.चरबी कमी करते.हिमोग्लोबिन वाढवते.अशक्तपणा जातो.स्नायू मजबूत होत पेटके कमी होतात.अशा गुणकारी फळाचे सेवन करावे.तरुणांनी याच्या वृक्षारोपणासाठी पुढे यावे. 
नरेंद्र नाईक,जिल्हा कृषीअधीक्षकबुलढाणा.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Male in Panhala taluka bullock heart food story by anil more