'आरक्षण मिळेपर्यंत मशाल पेटती ठेवणार' 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 12 October 2020

आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली आहे. ही स्थगिती उठवण्यासाठी शासनाने पाठपुरावा करावा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.

गडहिंग्लज : मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्‍नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येथील सकल मराठा समाजातर्फे दसरा चौकातील अश्‍वारूढ शिवरायांच्या पुतळ्यासमोर रास्ता रोको आंदोलन केले. आरक्षण मिळेपर्यंत लढ्याची मशाल पेटती ठेवण्याचा निर्धार समाजाने केला. या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक विस्कळित झाल्याने पर्यायी मार्गाने वाहने वळवली. 

आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली आहे. ही स्थगिती उठवण्यासाठी शासनाने पाठपुरावा करावा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. सकाळी साडेदहापासून समाजबांधव दसरा चौकात एकत्र येत होते. नागेश चौगुले व इतर तरुण मोटारसायकल रॅलीद्वारे घोषणा देत आंदोलनात सहभागी झाले. दसरा चौकात रिंगण करून कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. सहायक पोलिस निरीक्षक दिनेश काशीद यांच्या मार्गदर्शनाने कडक पोलिस बंदोबस्त होता. या वेळी एक मराठा...लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे...नाही कुणाच्या बापाचे आदी घोषणांनी चौकाचा परिसर दणाणून गेला. 

ऍड. दिग्विजय कुराडे यांनी स्वागत केले. समाजाचे अध्यक्ष किरण कदम, प्रा. सुनील शिंत्रे, सुरेश कोळकी, प्रा. शिवाजी भुकेले, विठ्ठल भमानगोळ, सूरज आसवले, राजेंद्र तारळे, शोभा कोकीतकर यांची भाषणे झाली. कोळकी यांनी लिंगायत समाजाचा तर भम्मानगोळ यांनी धनगर समाजातर्फे मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दर्शविला. केंद्रातील सरकारने राजकारण बाजूला ठेवून मराठा आरक्षणाकडे लक्ष द्यावे. संसदेत याप्रश्‍नी चर्चा करून मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण मिळावे. आरक्षण मिळेपर्यंत लढ्याची मशाल पेटती ठेवण्याचे आवाहन कदम यांनी केले. तरुणांना आरक्षणाच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी ठिय्या आंदोलन केले असून, भविष्यातही शांततेच्या मार्गाने लढा सुरू ठेवण्याचे आवाहन भुकेले यांनी केले. नायब तहसीलदार अशोक पाटील यांना मागण्यांचे निवेदन दिले. 

आंदोलनात वसंत यमगेकर, मंजूषा कदम, नागेश चौगुले, विद्याधर गुरबे, स्नेहा भुकेले, विश्‍वास खोत, उत्तम देसाई, संजय पाटील, उदयसिंह चव्हाण, नेताजी पाटील, राहुल शिरकोळे, संदीप चव्हाण, विकास मोकाशी, शिवाजी कुराडे, प्रकाश पोवार, स्वाती चौगुले, सुदर्शन चव्हाण, शीतल पाटील, प्राजक्ता पाटील, डॉ. बेनिता डायस, प्रभात साबळे, अमर मांगले, अविनाश ताशिलदार आदी सहभागी झाले होते. 

हे पण वाचा - दोन राज्यांचे भक्तीस्थान असलेल्या घोडेश्वरची यात्रा रद्द

 

मागण्या अशा 
शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेत एसईबीसी कोट्यातून प्रवेश 
आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत नोकर भरती नको 
अण्णासाहेब पाटील महामंडळाला 100 कोटी 
सारथी संस्थेला स्वायत्तता द्या 
मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत 
आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांना एसटीसह गुणवत्तेनुसार इतर नोकरीत प्राधान्य 

दिव्यांगांचा सहभाग 
मराठा समाजातील तरुणांच्यादृष्टीने आरक्षण मिळणे अत्यावश्‍यक बनले आहे. आजच्या आंदोलनात एका पायाने दिव्यांग असलेल्या गिजवणेतील विनायक चौगुले या युवकाने तासभर आंदोलनात सहभागी होऊन मराठा तरुणांना आरक्षणाची गरज किती आहे, हेच दाखवून दिले. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maratha community protest in kolhapur gadhinglaj