बळजबरीने परिक्षा घेतल्यास परीक्षा हॉल फोडू  ; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा 

युवराज पाटील 
Thursday, 1 October 2020

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर एमपीएससीकडून परिक्षेची तयारी सुरू आहे.

कोल्हापूर - मराठा समाजाला नेमके कोणत्या प्रवर्गातून आरक्षण मिळणार आहे, हे राज्य शासनाने स्पष्ट करावे. तोपर्यंत राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षा घेण्यात येऊ नयेत. बळजबरीने परिक्षा घेतल्यास प्रसंगी परीक्षा हॉल फोडू असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज देण्यात आला. संघटनेचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांनी हा इशारा दिला. यावेळी सचिन तोडकर, दिलीप पाटील, स्वप्नील पार्टे, विशाल पाटील आदी उपस्थित होते. 

या मागणीची दखल न घेतल्यास 6 ऑक्‍टोबरला मातोश्रीवर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. 

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर एमपीएससीकडून परिक्षेची तयारी सुरू आहे. हॉलतिकीटचे वाटप सुरू आहे. ही परिक्षा झाल्यास मराठा समाजातील विद्यार्थी विद्यार्थिनींवर अन्याय होणार आहे. त्यामुळे परिक्षा प्रक्रीया रद्द करण्यात यावी तसेच राज्यशासनाला 5 ऑक्‍टोबरपर्यंत अल्टिमेटम देत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. मराठा विद्यार्थ्यांना वयाची मर्यादा वाढवून संरक्षण द्यावे, आरक्षणाला स्थगिती असल्याने परिक्षा होणार असली तरी मुळ अर्ज एसईबीसी मधून असल्याने सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठवल्यानंतर ही निवड प्रक्रीया एसईबीसी आरक्षणामधून राबविली जाणार की कसे, याबाबत सुस्पष्टता हवी आहे. महावितरण, वनविभाग, आरोग्य, कृषी, महसुल तसेच अन्य विभागांत 9 सप्टेंबरपूर्वी नोकरभरतीच्या जाहिराती जाहीर झाल्या होत्या. त्यासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत.

हे पण वाचाकुस्ती सुटली तरी गड्याची तांबड्या मातीशी नाळ कायम ; सोशल मीडियाद्वारे करतोय कुस्तीचा प्रचार 

आरक्षणावरील स्थगिती उठवेपर्यंत या परिक्षाही स्थगित कराव्यात. एसईबीसी विद्यार्थ्यांचा कोणत्या प्रवर्गातून समावेश करणार, याबाबत स्पष्ट निर्देश देऊन भरती प्रक्रीया राबवावी, अशी मागणी करण्यात आली. 

 संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maratha morcha altimeter to government on upsc exam