Video : पोलीसांची दडपशाही ; आंदोलनापूर्वीच मराठा तरूणांना घेतले ताब्यात : कोठे घडला प्रकार वाचा...

युवराज पाटील
Sunday, 13 September 2020

आंदोलक व पोलीसांच्यात झटापट

आंदोलक आक्रमक

 

शिरोली पुलाची (कोल्हापूूर) : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने सकल मराठा समाजातर्फे महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला ; मात्र त्यापूर्वीच पोलीसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलक व पोलीसांच्यात झटापट झाली. आक्रमक झालेल्या आंदोलकांनी राज्य सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली. 

मराठा आरक्षण कायद्याला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे. यामुळे मराठा समाज अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे सकल मराठा समाजाने आज महामार्ग रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे सकाळी नऊ पासूनच कार्यकर्ते तावडे हॉटेल येथे जमा होत होते ; मात्र आज नीटची परीक्षा असल्याने विद्यार्थ्याना त्रास होऊ नये यासाठी बारा पर्यंत आंदोलक थांबून होते. यानंतर आरक्षण आमच्या हक्काचे, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, जय भवानी - जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव च्या घोषणा देत आंदोलक महामार्गाकडे निघाले. आंदोलक महामार्गावर येताच, पोलीसांनी त्यांना ताब्यात घेण्यास सुरवात केली. यामुळे आंदोलक व पोलीसांच्यात झटापट झाली. पोलीसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. 

हेही वाचा- मराठा आरक्षणावरुन समरजितसिंह घाटगे यांनी सरकारवर डागली तोफ -

आजवर आम्ही शांतपणे आंदोलने केली मात्र आता आरक्षणासाठी मराठ्यांचा हिसका दाखवावा लागेल. आरक्षण मिळाले नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.
मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे, अन्यथा पुणे, मुंबईची दुध वाहतूक रोखण्याचा इशारा सचिन तोडकर यांनी दिला
दिलीप पाटील, स्वप्नील पार्टे, सचिन तोडकर, रविंद्र मुतगी, राजेंद्र चव्हाण, उदय प्रभावळे, योगेश खाडे, आभिषेक सावंत, सचिन कांबळे, समरजीत तोडकर, मन्सुर नदाफ, नितीन देसाई, सुनिल चव्हाण, योगेश भोसले, ईश्वर पाटील, सम्राट शिर्के, महेश अनावकर, अनिकेत मुतगी, गणेश खोचीकर, विशाल खोचीकर आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

हेही वाचा- इफको संस्थेच्या सभासद संस्थांसाठी खुशखबर ; खात्यामध्ये होणार 20 टक्के डिव्हीडंड जमा -

सकल मराठा समाजाचे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, याची दक्षता घेत पोलीस प्रशासनाने मोठा फौजफाटा तैनात केला होता. त्यामुळे आंदोलकांपेक्षा पोलीसांची संख्या जादा असल्याचे चित्र आंदोलन स्थळी पहायला मिळाले. पोलीस उपअधिक्षक प्रशांत अमृतकर, प्रेरणा कट्टी, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले, सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात होता.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha youths taken into custody even before the agitation pulachi shiroli kolhapur