esakal | मराठी राजभाषा दिन ; शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाला चार साहित्यकृतींचे तोरण

बोलून बातमी शोधा

marathi rajbhasha day celebrate four students entry in marathi literature in kolhapur}

केवळ अभ्यासक्रमाच्या गोतावळ्यात न रमता त्यांचा शब्दभंडारातील हा प्रवेश नवोदित विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारा आहे.

मराठी राजभाषा दिन ; शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाला चार साहित्यकृतींचे तोरण
sakal_logo
By
मतीन शेख

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाने दिलेल्या शब्दसंस्काराच्या बळावर चार विद्यार्थ्यांनी साहित्य क्षेत्रात दमदार पाऊल टाकले आहे. त्यांच्या पाच साहित्यकृतींनी विभागाला सृजनशीलतेचे नवे तोरण बांधले असुन यातील एका विद्यार्थ्यांच्या साहित्य कृतीने थेट राष्ट्रीय पुरस्कारावर शिक्का मोर्तब केला. केवळ अभ्याक्रमाच्या गोतावळ्यात न रमता त्यांचा शब्दभंडरातील हा प्रवेश नवोदित विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारा ठरला आहे. विभागाच्या नवनाथ गोरे, डॉ.दत्ता घोलप, विष्णू पावले, डॉ.सयाजीराव गायकवाड या विद्यार्थ्यांनी साहित्य नवनिर्मितीची नवी वाट चोखंदळी आहे. मराठी विभागातून पुढे आलेल्या या नवलेखकांच्या हातून मराठी भाषेची सेवा होत आहे. नव्या पिढीला उर्मी व आत्मविश्वास देण्याचे काम विभागाचे माजी विभाग प्रमुख जेष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस, विभाग प्रमुख प्रा. डॉ. रणधीर शिंदे, प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांच्याकडून होत आले आहे.

• नवनाथच्या जीवनानुभवाची समृद्ध 'फेसाटी'...

दुष्काळी जत तालुक्यातील एका छोट्या गावातून मजुरी करणाऱ्या कुटूंबातून नवनाथ गोरे एम. ए करण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागात आला. ग्रामीण भागातून आल्याचा न्यूनगंड नेहमी मनात दाटलेला असायचा. पण विष्णू पावले या लिहिणाऱ्या मित्रामुळे आपणही आपले जग लिहावे असे त्याला वाटू लागले. सुरुवातीला त्याने काही कथा लिहिल्या. पुढे काही तरी आपलीच मोठी गोष्ट त्याने लिहली. मराठी विभागाने नवलेखक अनुदान योजनेतून प्रसिद्धीसाठी साहित्य सांस्कृतिक मंडळाकडे ती पाठवली. नवनाथ यांने आपल्या वाट्या आलेल्या दारिद्र्याचे उदात्तीकरण करण्यापेक्षा अनुभवाची दाहक वास्तवता शब्दबद्ध केलेल्या ‘फेसाटी’ ला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार प्राप्त झाला आहे. विभागाच्या नावे हा मैलाचा दगड रोवला गेला आहे.

• कादंबरी समीक्षेची परिभाषा गवसलेले 'दत्ता घोलप'....

बार्शी तालुक्यातून आलेल्या दत्ता घोलपला पुस्तकांबद्दल, पुस्तकातील जगाबद्दल सदैव कुतुहल अन् ओढ. पुस्तकांच्या जगाबद्दलचे कोपरे शोधावेसे वाटणारा दत्ता एम. ए. नंतर काही वर्षे सीएचबीचा शाप सोसला मात्र याही काळात सतत आपल्यातला वाचक जागृत ठेवला. एकरेषीय वाचन न ठेवता नाही. वैचारिक, एकोणिसावे शतक, कादंबर्‍या, समीक्षा असे बहुविध वाचन केलं. पुढे पीएचडीसाठी भालचंद्र नेमाडे यांचे साहित्य निवडत ते पुर्ण ही केलं. आपल्यातला चिकित्सक,संशोधक विद्यार्थी कायम ठेवत त्यांनी मराठी कादंबरीचा समाजसंस्कृतीदृष्ट्या अभ्यास सुरु ठेवला आणि मराठी कादंबरी आशय आणि अविष्कार हा समीक्षाग्रंथ त्यांचा पुढे प्रसिद्ध झाला आहे. साहित्यवर्तुळात या नव्या समिक्षकाची चर्चा घडून आली. या साहित्य कृतीसाठी त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा युवा समिक्षक पुरस्कार ही प्राप्त झाला.

• विष्णुचे प्रगल्भ गद्य म्हणजे 'पधारो म्हारो देस'....

चांदोली धरणाजवळील पावलेवाडी या छोट्या गावातून विद्यापीठात शिक्षणासाठी आलेला. कमवा आणि शिका या योजनेमध्ये काम करत त्याने एम. ए शिक्षण घेतले. लिहिण्या-वाचण्याची त्याला अनावर अशी ओढ होती. कुटुंबात कायम विवंचनेचा पाडा. एम. ए. पर्यंतचे शिक्षण काम करत त्याने घेतल. आपण खूप वाचावं, खूप ऐकावं आणि लिहावं असं विष्णूला आतून वाटत राहायचं. शब्दांशी,अक्षरांचे नाते त्याने कायम ठेवले. या प्रवास वर्णनात राजस्थान भेटीचा वृत्तांत त्यांनी आपल्या खास शैलीत मांडला आहे. तेथील कला,साहित्य संस्कृतीचं चित्रण त्यांनी या पुस्तकातून उभे केले आहे. समाजनिरीक्षणे, मानवी स्वभावदर्शनाचे पावले यांनी वेगळ्या तर्हेने मांडली आहेत. राजस्थान मधील विविध स्थळे, वास्तू, प्रदेश व वैशिष्ट्यपूर्ण निसर्गनिरखण त्यांच्या लेखनातून प्रकटली आहे. या पुस्तकामुळे प्रवासवर्णनकथानाच्या कक्षा विस्तारणारे लेखक विष्णू पावलेंच्या रुपाने पुढे आला आहे.

• पोवाडेचे स्वरुप विषद करणारे 'सयाजीराव'....

माळशिरस तालुक्यातून मराठी विभागात आलेले सयाजी गायकवाड. मराठी कथा,कविता,कादंबरीसह पोवाडा,लावण्या,शाहिरी याकडे ओढा असणाऱ्या सयाजी यांनी एम. ए. नंतर याच विषयात संशोधन करण्याचे ठरवले. 'स्वातंत्र्यात्तर मराठी पोवाडा' या विषयात त्यांनी संशोधन करत पीएच. डी मिळवली 'शाहिरी वाड्मयात सामाजिक - सांस्कृतिक दृष्टीकोनातून ते पुढील अभ्यास करत आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील मराठी पोवाड्याचे स्वरूप विशद करणारा ग्रंथाची त्यांनी निर्मिती केली आहे. पोवाडा रचना प्रकाराच्या उगम, वाटचालीबरोबर शिवशाही ते वसाहत काळातील पोवाड्याचे विषयस्वरूप डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी या ग्रंथातून सांगितले आहे.