झेंडूच्या फुलांना पुन्हा कवडी मोल दर

युवराज पाटील
Saturday, 26 September 2020

सध्या अधिक महिन्यामुळे सर्व मुहूर्त अथवा कार्यक्रम नसल्याने झेंडूच्या फुलांना कवडी मोल दर मिळत आहे. बाजारपेठेत ग्राहकच नसल्याने अवघ्या 10 ते 15 रुपये किलो दराने फुले देण्याची वेळ फूल उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे.

दानोळी : सध्या अधिक महिन्यामुळे सर्व मुहूर्त अथवा कार्यक्रम नसल्याने झेंडूच्या फुलांना कवडी मोल दर मिळत आहे. बाजारपेठेत ग्राहकच नसल्याने अवघ्या 10 ते 15 रुपये किलो दराने फुले देण्याची वेळ फूल उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामध्ये मुंबई ही फुलांसाठी हक्काची बाजारपेठ असून तेथेच ग्राहक नसल्याचा परिणाम दरावर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळेनासा झाला आहे. परिणामी शेतकरी तोडणी बंद, शेतात मेंढरे घालणे किंवा फुलांची झाडे काढून टाकत आहेत. 

लॉकडाउन सुरू झाल्यापासून इतर शेती मालासोबत झेंडूच्या फुलाच्या मागणीवरही परिणाम झाला. अनलॉकमध्ये भाजीपाला व इतर शेती उत्पादनांची मागणी वाढत गेली. मात्र, अनलॉकमध्येही कार्यक्रम, पूजाअर्चा याच्यावर निर्बंध असल्याने फुलांची मागणी वाढलेली नाही. त्यामुळे लॉकडाउनपासूनच झेंडू फुलांचे दर घसरले आहेत. गणेशोत्सवामध्ये मात्र फुलांच्या तुटवड्यामुळे झेंडू फुलांना विक्रमी दर मिळाला. त्याच्यानंतर पुन्हा फुलांचे मार्केट पडलेले आहे. आता तर ते 10 ते 15 रुपयांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादित खर्च तर सोडाच वाहतुकीच्या खर्चाचाही मेळ घालणे अवघड झाले आहे. 

फुलांना गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, लग्न हंगाम यावेळी मागणी व दर असतो. प्रत्येकवर्षी या हंगामात सरासरी झेंडू फुलांना किलोला 50 ते 80 रुपये तर शेवंती फुलांना 150 रुपये दर असतो. गेल्यावर्षी गणेशोत्सव व दिवाळीत दर होता. त्यानंतर सातत्याने 20 ते 30 रुपये दर मिळत आला आहे. परिस्थिती सुधारून पाडवा व लग्न हंगामात दर मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी फुलांची लागवड केली. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे फुले न तोडण्याची अथवा टाकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. यावर्षी फक्त गणेशोत्सवामध्ये दर उच्चांकी गेला. त्यानंतर पुन्हा दर घसरला आहे. 

गेल्यावर्षीपासून दर नाही
गेल्यावर्षीपासून फुलाला दर मिळत नाही. गणेश चतुर्थीत चांगला दर मिळाला. तो अल्पकाळ टिकला. आता पुन्हा दर कमी झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. 
- भरतेश खवाटे, शेतकरी फूल उत्पादक संघ 

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marigold Flower Prices Fell Again Kolhapur Marathi News