माथाडींना मिळणार  पाच हजारांची मदत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

कोरोना लॉकडाउनमध्ये रोजगार बुडालेल्या माथाडी कामगारांना जिल्हा माथाडी मंडळाने प्रत्येकी पाच हजार रुपये द्यावेत, असे आदेश कामगार विभागाने दिले.

कोल्हापूर : कोरोना लॉकडाउनमध्ये रोजगार बुडालेल्या माथाडी कामगारांना जिल्हा माथाडी मंडळाने प्रत्येकी पाच हजार रुपये द्यावेत, असे आदेश कामगार विभागाने दिले. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात किमान तीन हजार कामगारांना लाभ मिळणार आहे. 
यातून अंदाजे एक कोटी 50 लाखांचा लाभ होईल. 
ज्येष्ठ नेते शरद पवार व कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर हा निर्णय झाला. माथाडींचा रोजगार हिरावल्याचे वृत्त "सकाळ' मधून प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर जिल्हा हमाल पंचायतीने माथाडी कामगारांसाठी आर्थिक मदतीची मागणी केली होती. याचे फलित म्हणून माथाडींना पाच हजारांची आर्थिक मदत मिळणार आहे. 
अशी माहिती हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष कृष्णात चौगुले यांनी दिली. शाहू मार्केट यार्ड, रेल्वे गुडस, लक्ष्मीपुरी धान्य बाजारसह जिल्ह्यातील विविध तालुका, धान्य बाजारपेठेत नोंदणीकृत माथाडी कामगार काम करतात. त्यांची नोंदणी जिल्हा माथाडी मंडळाकडे आहे. मार्चमध्ये लॉकडाउन सुरू झाला. माल वाहतूक बंद होती. काम नाही म्हणून अनेक माथाडी कामगार गावी गेले. त्यामुळे माथाडी कामगारांचे आर्थिक नुकसान झाले. 

"सकाळ'च्या वृत्तानंतर पाठपुरावा 
माथाडी कामगाराचा रोजगार गेला, गैरसोय झाली. याचे वृत्त "सकाळ'मधून प्रसिद्ध झाले. यावेळी माथाडी पंचायतीने माथाडी कामगारांना मदत मिळावी, यासाठी पाठपुरावा सुरू केला. राज्यभरातील स्थिती, माथाडींची झालेली गैरसोय, याविषयी डॉ. बाबा आढाव यांनी शरद पवार यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. त्याची दखल सरकारने घेतली. कामगार विभागाने पाच हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mathadis will get help of five thousand