Mayfly Insects Found In Gadhinglaj Kolhapur Marathi News
Mayfly Insects Found In Gadhinglaj Kolhapur Marathi News

गडहिंग्लजला आढळलेले "ते' किटक "मे फ्लाईज'

गडहिंग्लज : ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान हिरण्यकेशी नदीवरील जरळी व भडगाव पुलावर येणारी लाखो किड्यांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता नागरिकांना असते. दरवर्षीपेक्षा यंदा या किड्यांमुळे झालेल्या अपघातांनी त्याची अधिक चर्चा झाली. यामुळे या किड्यांच्या उत्पत्तीविषयी शास्त्रीय माहिती जाणण्याचे काम "सकाळ'ने केले. शिवराज महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्रा. किशोर अदाटे यांच्या मदतीने तपासणी अंती या किड्यांची ओळख पटली असून, त्याचे नाव "मे फ्लाईज' असल्याचे त्यांनी सांगितले. 

प्रामुख्याने हे किडे मे महिन्यात येतात. परंतु, वातावरणातील बदलामुळे अलीकडे हे किडे ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यानही येत असतात. मुख्यत्वे हे किडे गोड्या पाण्याच्या सरोवरात, नदी, नाले यांच्या तळाशी असतात. सायंकाळी अंधार पडल्यानंतर ते पाण्यातून बाहेर येतात. विजेच्या प्रखर प्रकाशाकडे आकर्षित होतात. हे किडे बाहेर येण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रजनन असते. हे किडे लाखोंच्या संख्येने बाहेर येतात. प्रजननानंतर नर किडे लगेच मृत होतात. मादी किडे पुन्हा पाण्यात जाऊन अंडी घालतात. त्यांच्या झुंडीची व्याप्ती इतकी असते की ते कधी-कधी चारशे ते आठशे मीटर परिसर पूर्णत: व्यापतात. 

खाली पडल्यानंतर हे किडे घट्ट अशा जमिनीला चिकटून बसतात. म्हणून या मृत पावणाऱ्या नर किड्यांमुळे रस्त्यावर खच तयार होतो. तेलकट द्रवपदार्थ रस्त्यावर तयार होतो. यात वेगाने जाणारी वाहने घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. जरळी बंधारा आणि भडगाव पुलावर पथदिवे असतात. त्यामुळे हे किडे त्याला आकर्षित होऊन लाखोंच्या संख्येने बाहेर येतात.

मृत किड्यांच्या खचमुळे जरळी बंधाऱ्यावर पंधरा दिवसांपूर्वी 25 हून अधिक वाहने घसरली. भडगाव पुलावर, तर एका ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच ट्रॅव्हल्स नदीत कोसळण्यापासून वाचली. यंदा या किड्यांची अधिक चर्चा झाल्याने "सकाळ'ने या किड्यांच्या उत्पत्तीविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी शिवराज महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्रा. किशोर अदाटे यांची मदत मिळाली. त्यांनी किड्यांची ओळख पटवण्यासाठी मृत झालेले किडे बाटलीतून महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत आणले. तेथे या किड्यांची ओळख पटवण्याचे काम त्यांनी केले. 

"हिरण्यकेशी स्वच्छ'चा दावा 
विशेष करून स्वच्छ पाण्याच्या डबकी आणि स्वच्छ नदीमध्ये हे किडे तळाला वास्तव्य करतात. कारण ते प्रदूषकांबद्दल अत्यंत संवेदनशील असतात. शेवाळ हे त्यांचे खाद्य असते, तर माशांचे खाद्य हे किडे असतात. हिरण्यकेशी नदीतून हे किडे दरवर्षी बाहेर येतात. म्हणजेच नदीचे पाणी स्वच्छ आणि प्रदूषण विरहीत असल्याचा दावाही या किड्यांच्या वास्तव्यामुळे करता येतो, असेही अदाटे यांनी सांगितले. 

मुक्तता कशी मिळवाल? 
घरासभोवतालीसुद्धा प्रखर प्रकाशात हे किडे गोळा होतात. त्यावेळी या किड्यांची तीव्रता कमी करण्यासाठी दिव्यांच्या रचनेत बदल करण्याची गरज आहे. उच्च दाब सोडियम दिव्यांच्या जागी बाष्प दिवे बसवावेत. पांढऱ्या इनडिसेंट फ्लुरोसंट बल्बच्या ठिकाणी पिवळे बल्ब बसवावेत.

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com