व्हिडिओ : शूर तानाजीची कवड्यांची माळ, तळपती तलवार पारगडावर नाही तर मग कुठे...?

सुनील कोंडुसकर
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

 चंदगड तालुक्‍यातील ऐतिहासिक किल्ले पारगड येथे नरवीर तानाजी मालुसरे व सूर्याजी मालुसरे यांच्या वंशजांची बैठक झाली. कवड्यांची माळ, तळपती तलवार पारगडावरच ठेवायला हवी.तानाजी मालुसरे यांची ३५० वी पुण्यतिथी उमरठ येथे १६ व १७ तारखेला साजरी होणार आहे.

चंदगड (कोल्हापूर) - हिंदवी स्वराज्यात ज्यांनी अजोड पराक्रमाने शौर्यशाली इतिहास रचला, त्या नरवीर तानाजी मालुसरे यांनी वापरलेल्या वस्तू तसेच शिवरायांनी तानाजी मालुसरे यांना दिलेली समुद्री कवड्यांची राजमाळ तसेच ज्या तळपत्या तलवारीने तानाजी मालुसरे यांनी शौर्य गाजविले, ती तलवार पारगड येथील मालुसरे कुटुंबीयांच्या देव्हाऱ्यात असायला हव्यात, असा आग्रह राज्यात विविध ठिकाणी वास्तव्याला असलेल्या मालुसरे कुटुंबीयांनी धरला आहे. ऐतिहासिक साधनांवर वैयक्तिक मालकी नसावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मालुसरे वंशज एकत्र आले 

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्‍यातील ऐतिहासिक किल्ले पारगड येथे नरवीर तानाजी मालुसरे व सूर्याजी मालुसरे यांच्या वंशजांची बैठक झाली. कवड्यांची माळ, तळपती तलवार पारगडावरच ठेवायला हवी.तानाजी मालुसरे यांची ३५० वी पुण्यतिथी उमरठ येथे १६ व १७ तारखेला साजरी होणार आहे. त्याचे पारगडवासीयांना निमंत्रण देण्यात आले.यानिमित्त महाराष्ट्रात विविध ठिकाणी वास्तव्याला असलेले मालुसरे वंशज एकत्र आले होते. बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. छत्रपती शिवरायांनी या गडाचे किल्लेदार म्हणून तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा यांची नियुक्ती केली होती. शिवरायांनी तानाजी मालुसरे यांना दिलेली समुद्री कवड्यांची राजमाळ तसेच ज्या तलवारीने तानाजी मालुसरे यांनी शौर्य गाजविले, त्या तलवारीचा कुटुंबातील काही सदस्यांकडून स्वतःची मालमत्ता असल्यासारखा वापर केला जात असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. त्यादृष्टीने चर्चा होऊन ऐतिहासिक ठेवा असलेली कवड्यांची माळ व तलवार पारगडावरच ठेवायला हवी, असा आग्रह धरण्यात आला.

वाचा - ... जेव्हा एक महिला पोलिसांच्या अंगावर जाते.

चित्रपटात इतिहासाची छेडछाड

‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात दाखविलेल्या काही दृश्‍यांवर तसेच इतिहासाची छेडछाड केल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. मालुसरे कुटुंबीयांकडे असलेली विविध ऐतिहासिक साधने तसेच गडावरील मावळ्यांच्या वंशजांकडे असलेल्या ऐतिहासिक साधनांचे गडावर वस्तुसंग्रहालय करण्याबाबत चर्चा झाली. पर्यटकांसाठी हा अनमोल ठेवा असेल, असे मत कान्होबा माळवे यांनी व्यक्त केले. दरम्यान, उमरठ येथे १६ व १७ तारखेला होणाऱ्या तानाजी मालुसरे यांच्या ३५० व्या पुण्यतिथी उत्सवात सहभागी होण्याचा निर्णय पारगडवासीयांनी घेतला. अनिल मालुसरे, महेश मालुसरे, शिवराय मालुसरे, चंद्रकांत मालुसरे, अंकुश मालुसरे, रामचंद्र मालुसरे, आप्पाजी मालुसरे यांच्यासह मालुसरे वंशावळीतील अनेक जण उपस्थित होते.

पारगड किल्ल्याची वेबसाईट पाहून अनेक पर्यटक गडाला भेट देतात. त्या वेळी ते गडावर तानाजी मालुसरे यांची तलवार व कवड्यांची माळ पाहायला मिळेल का, अशी विचारणा करतात. परंतु, हा अनमोल ठेवा त्यांना पाहायला मिळत नाही, हे दुर्दैवी आहे. 
- कान्होबा माळवे, पारगडवासीय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting with the descendants of Tanaji Malusare and Suryaji Malusare on pargad