सूतदरवाढीबाबत इचलकरंजीत मंगळवारी बैठक

ऋषिकेश राऊत
Saturday, 12 December 2020

सूतदरवाढीसंदर्भात अद्याप कोणताच निर्णय न झाल्याने यंत्रमागधारक संघटनांनी पुन्हा प्रांत कार्यालयाकडे धाव घेतली. समाजातील प्रत्येक घटकावर अन्याय होत असताना शासनाने दुवा बनून समस्या सोडवल्या पाहिजेत.

इचलकरंजी : सूतदरवाढीसंदर्भात अद्याप कोणताच निर्णय न झाल्याने यंत्रमागधारक संघटनांनी पुन्हा प्रांत कार्यालयाकडे धाव घेतली. समाजातील प्रत्येक घटकावर अन्याय होत असताना शासनाने दुवा बनून समस्या सोडवल्या पाहिजेत. स्थानिक सूत व्यापारी व यंत्रमागधारक संघटना यांची संयुक्त बैठक घेऊन सूतदरवाढीवर नियंत्रण आणावे, अशी ठाम मागणी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांच्याकडे केली. अखेर प्रांताधिकारी डॉ. खरात यांनी सूतदरवाढीवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी (ता.15) प्रांतकार्यालयात संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले. 

काही दिवसांपासून सुताचे दर भडकल्याने सूत व्यापारी व यंत्रमागधारक संघटना यांच्यातील वाद टोकाला पोहोचला आहे. प्रांताधिकाऱ्यांनी सूतदरवाढीच्या प्रश्नावर यंत्रमागधारक व सूत व्यापारी या दोन्ही बाजूंकडून मत-मतांतरे समजून घेतली. यंत्रमागधारकांच्या आंदोलनानंतर प्रांत कार्यालयात बैठकही झाली.

यंत्रमागधारक संघटना व सूत व्यापाऱ्यांच्या स्वतंत्रपणे बैठका झाल्यानंतर अपेक्षित उत्तर यंत्रमागधारकांना मिळाले नाही. त्यामुळे संतप्त यंत्रमागधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पुन्हा प्रांताधिकारी डॉ. खरात यांची भेट घेऊन कैफियत मांडली. यंत्रमागधारकांच्या भावना समजून घेत प्रांताधिकाऱ्यांनी सूत दरवाढीसंदर्भात मंगळवारी (ता.15) यंत्रमागधारक संघटना व स्थानिक सूत व्यापारी यांची एकत्र बैठक घेणार असल्याचे सांगितले. 

मागणीचे निवेदन प्रांताधिकारी डॉ. खरात यांनी स्वीकारले. यावेळी सतीश कोष्टी, पुंडलिकराव जाधव, प्रकाश मोरे, राजाराम धारवट, पांडुरंग धोंडपुडे, विनय महाजन, राजगोंडा पाटील, विश्वनाथ मेटे, सुनील मेटे आदी उपस्थित होते. 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting On Tuesday In Ichalkaranji Regarding Yarn Price Hike Kolhapur Marathi News