डॉक्टर नारळीकरांचे कोल्हापूरशी आहे खास नाते

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 January 2021

कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

कोल्हापूर : नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पद्मभूषण, पद्मविभूषण, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त मराठी विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाली आणि यानिमित्ताने कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. 

दरम्यान, डॉ. नारळीकर मुळचे कोल्हापूरचे. त्यांच्या एकूणच कार्याबद्दल येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे २००१ साली त्यांचा मानाचा राजर्षी शाहू पुरस्कार देवून गौरव झाला होता. १९ जुलै १९८३ रोजी कोल्हापूर येथे डॉ. नारळीकर यांचा जन्म झाला. महाद्वार रोड परिसरात त्यांचे वास्तव्य होते. राजाराम महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. डॉ. नारळीकर यांचे वडील रॅंगलर नारळीकर विद्यापीठ हायस्कूलचे दीर्घकाळ संचालक होते. यानिमित्ताने डॉ. नारळीकर यांनीही विद्यापीठ हायस्कूलला अनेकदा भेट दिली. त्यांच्या आई श्रीदेवी यांच्या नावाने शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात येते. 

नारळीकरांनी त्यांच्या आत्मचरित्रात कोल्हापूरशी असलेलं नात सांगितलं आहे. कोल्हापूरात जन्म झालेल्या नारळीकरांनी विद्यापीठ आणि राजाराम हायस्कुलमध्ये शिक्षण घेतलं. त्यांनतर मॅट्रिकच्या परीक्षेत नंबर आला आणि ते मुंबईला शिकायला गेले. त्यांनी म्हंटलंय की बालपणी सुट्टीत कोल्हापूरला येणं-जाणं व्हायचं. वर्ष दोन वर्षातून उन्हाळी सुट्टीला आलं की दोन महिने कसे जायचं हे कळायचं नाही. महाद्वार रोडवर त्यांचा मोठा वाद होता. रस्ता रुंदीकरणात तो पाडण्यात आला असंही त्यांनी आत्मचरित्रात म्हंटलं आहे.

हेही वाचा - कोल्हापूरची पोरं हुश्शार! ; स्नेहा व सोहनच्या प्रदर्शनातील निसर्गचित्रे जाणार मंत्रालयात   

डॉ. नारळीकर यांना आजवर अनेक सर्वोच्च सन्मान मिळाले आहेत. कोल्हापूरच्या वतीनेही त्यांना 'करवीरभूषण', 'कोल्हापूरभूषण' आदी पुरस्कारांनी गौरवण्यात आले. राजर्षी शाहू पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते म्हणाले होते, 'जननी जन्मभूमीला आईपेक्षा श्रेष्ठ मानले जाते. आईने आपल्यासाठी काही केले तर आपण तिचे आभार मानणे कृत्रिम ठरेल. शाहू पुरस्काराच्या माध्यमातून कोल्हापूरने दिलेला आपुलकीचा संदेश मी सानंद, साभिमानाने स्वीकारतो आहे.'

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the memories of jayant narlikar in kolhapur when shahu award declared for him