चंद्रकांतदादांचे दोन चेहरे, त्यांनी मुक्त चिंतन करावे ; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

minister hasan mushrif answer to chandrakant patil letter
minister hasan mushrif answer to chandrakant patil letter

कोल्हापूर : माजी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे दोन चेहरे आहेत. याबाबत त्यांनी मुक्तचिंतन करावे, असे प्रत्युत्तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे. दोन दिवसापूर्वीच पाटील यांनी मुश्रीफ यांना लिहिलेल्या पत्राला उलटटपाली उत्तर मुश्रीफ यांनी दिले आहे. या पत्रात आतापर्यंत झाकून राहिलेल्या अनेक मुद्यांचा उल्लेख आहे.


पत्रात मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे, चंद्रकांतदादांनी मला पाठवलेले परंतु मला न मिळालेले पत्र प्रसिद्धी माध्यमातून वाचले आणि मी आश्चर्यचकित झालो. कारण कोरोनासदृश्य संकटकाळामध्ये त्यांनी कोल्हापूरकडे पाठ फिरवली. शिवाय मदतही दिली नाही, असे वक्तव्य अलीकडच्या काळात मी केलेले नाही. त्यामुळे त्यांनी पत्र लिहून कोरोना संकटांमध्ये किती मदत केली ही जाहीर करण्याची संधी मिळावी म्हणून निमित्त आहे, असे वाटते. दादा, गेल्या पाचवर्षांमध्ये तुम्हाला मिळालेली सत्ता व संपत्ती यांचा विचार करता दोन - तीन लाख लोकांना पाच वर्षे तुम्ही मदत कराल याची खात्री मला आहे. मी आणि माझ्या फौंडेशनने केलेली मदत जाहीर केली तर आपण पुन्हा ईडी, इन्कमटॅक्स माझ्या मागे लावाल. त्यामुळे मी जाहीर करत नाही. यापूर्वी मी अनेकवेळा तुमचे दोन चेहरे-स्वभाव आहेत, असे जाहीर केले होते. एक तुमचा स्वभाव दिसायला मृदू , लोकांना मदत करणारा, विचार न करता मुक्त वक्तव्य करणारा, दिसायलाही प्रांजळ. तर दुसरा स्वभाव म्हणजे मिळालेल्या सत्ता आणि संपत्तीचा आपला कोणीही विरोधक मग साधा टीका करणारा असो. त्याचा काटा काढायचा आणि त्याला जीवनातून उठवण्याचाच प्रयत्न करण्याचा. 

मी काय तुमचा शत्रू नव्हतो. जरूर वैचारिक विरोधक होतो. परंतु; मला संपवण्यासाठी केडीसीसी बँकेची कलम ८८ कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांच्यावर दबाव आणला, एमएससी बँकेवर ८८ ची कारवाई सुरु केली. मी सहकार क्षेत्रामध्ये राहूच नये म्हणून दहा वर्षे पूर्वलक्षी प्रभावाने अध्यादेश काढून कायदा केलात.

 ग्रामविकास विभागाने आर्सेनिक अल्बम होमिओपॅथिक गोळ्या 23 रू ला घेतल्या, त्या बाजारामध्ये 2 रू ला मिळतात, असे बेजबाबदार विधान केलात. मी बदनामी, फौजदारी दावा दाखल करण्याचे जाहीर केले. तसेच या गोळ्या खरेदी करण्याचे जिल्हा परिषदांना अधिकार दिले आहेत. त्यांना 2 रू ला गोळ्या द्याव्यात, असे जाहीर आवाहन करुनही अद्याप तुमचे उत्तर नाही. परंतु; तुमच्या पत्रांमध्ये त्याचा उल्लेखही नाही.

शिवाय 15 व्या वित्त आयोग ग्रामपंचायत 80 टक्के जि.प.दहा टक्के, पं.सं. दहा टक्के देण्याचा अधिकार विभागाने निर्णय घेतला. त्याबद्दल माझा सत्कार करण्यात आला. त्यावेळीही माझ्याबद्दल असलेल्या आपल्या भूमिकेमुळे आपण हा तर केंद्राचा, वित्त आयोगाचा निर्णय आहे. मुश्रीफ कसला सत्कार करून घेत आहेत? अशी टीका केली. त्यानंतर तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी देशांमधील राज्याचे त्रिस्तरीय वाटप आदेश पाठवले. त्याबद्दल, 'माझी चूक झाली, मी माहिती न घेता विधान केले होते'. याचाही साधा उल्लेखसुद्धा तुमच्या पत्रामध्ये नाही. अशी अनेक घडलेली उदाहरणे आहेत. तुमच्या दोन स्वभावाची. परंतु; जागेअभावी त्याचा उल्लेख करणे अशक्य आहे.

शत्रूलाही मी कधी त्रास दिला नाही, उलट सहकार्य केले. याबाबत माझे सहकारी सातत्याने माझ्या स्वभावावर टीका करत असतात. कागलला काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा खून झाला आहे. जो आरोपी आहे, त्याचा भाजपच्या नेत्याबरोबरचा फोटो समाज माध्यमांमध्ये फिरतो आहे. लोक म्हणतात, की त्यांचा पाठिंबा असावा. चौकशी झाली पाहिजे‌. या गोष्टीला माझा विरोध आहे. फोटो कोणीही काढून घेईल, पुरावे हवेत. विरोधक आहे म्हणून निष्कारण अशा गोष्टी करणे बरोबर नाही. हे मी आयुष्यामध्ये कधी केले नाही. पुरावे असतील तर पोलीस निष्कर्षाप्रत येतीलच. मी तुमच्यावर विनाकारण व्यक्तिगत टीका करून तुम्हाला वेदना देणार नाही, बदनामी करणार नाही. याची खात्री ठेवावी.
 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com