जनावरांचा चंद्रकांतदादांना शाप लागला, कोल्हापुरची जनता जगली की मेली, हे पाहायला देखील ते आलेले नाहीत...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मे 2020

'चंद्रकांतदादांना कोल्हापुरकरांनी भरभरुन दिले. त्यांना मोठे केले. पदवीधरच्या जागेवर त्यांना दोनदा निवडून दिले. ते मंत्री ही झाले. मात्र आता कोरोनाचे मोठे संकट आले आहे. कोरोनामुळे या 50 दिवसांत कोल्हापुरची जनता जगली की मेली, हे पाहायला देखील चंद्रकांतदादा आलेले नाहीत.'

कोल्हापूर - कोरोनाच्या संकटात या 50 दिवसात कोल्हापुरची जनता जगली की मेली, हे पाहायला देखील चंद्रकांतदादा आलेले नाहीत. ते सत्तेत असताना मात्र वारंवार कोल्हापुरला येत लक्ष्मीदर्शन करत होते.तसेच त्यांनी गोरगरीबांना काही लक्ष्मीदर्शन करता आले तर तेही करावे. असा टोला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला.

मुश्रीफ म्हणाले, 'चंद्रकांतदादांना कोल्हापुरकरांनी भरभरुन दिले. त्यांना मोठे केले. पदवीधरच्या जागेवर त्यांना दोनदा निवडून दिले. ते मंत्री ही झाले. मात्र आता कोरोनाचे मोठे संकट आले आहे. कोरोनामुळे या 50 दिवसांत कोल्हापुरची जनता जगली की मेली, हे पाहायला देखील चंद्रकांतदादा आलेले नाहीत. सत्ता असताना वारंवार कोल्हापुरला येवून ते लक्ष्मीदर्शन करत होते. आताही त्यांनी लक्ष्मीदर्शन केले असते, तर गरीबांना फार बरे झाले असते. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे, त्यांना कोल्हापुरात येण्यास काही बंदी नाही. ते मुंबईला जावू शकतात, तसेच ते कोल्हापुरला देखिल येवू शकतात. त्यांना सुरक्षा व्यवस्था आहे. पास मिळू शकतात. त्यामुळे त्यांनी कोल्हापुरात यावे. आम्ही जे कोरोनाविरुध्द काम सुरु केले आहे, ते पहावे. कागलपासून त्यांनी हे काम पहावे. हे काम पाहिल्यानंतर त्यांचे नक्कीच समाधान होईल.'

वाचा - पडळकरांची खोटी माहिती सांगुन चंद्रकांत पाटील लोकांना भूलवत आहेत

कोल्हापुरातील लोकांना नाउमेद करु नका

कोल्हापुरात तीन-तीन महिन्यांचा महापौर असतो, असे वक्‍तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. वास्तविक त्यांनी ज्यांच्यासोबत आघाडी केली आहे, त्या सहकाऱ्यांनीची ही पध्दत आणली आहे. सगळयांना संधी मिळावी, हा त्यामागचा प्रयत्न आहे. मात्र अशा प्रकारे कोल्हापुरचे नाव घेवून येथील लोकांना नाउमेद करण्याची गरज नाही, असे मुश्रीफ म्हणाले.

 जनावरांचा चंद्रकांतदादाला शाप लागला

सत्ता असती तर चांगले काम केले असते, या चंद्रकांतदादांच्या वक्‍तव्याचाही मुश्रीफ यांनी चांगलाच समाचार घेतला. या वक्तव्यावर ते म्हणाले, गतवर्षी चिखलीत महापूर आला, तेव्हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील हे महाजनादेश यात्रेत गुंतले होते. आम्ही त्यांना यात्रा थांबवून जिल्ह्यात येण्याचे आवाहन केले. तरीही त्यांनी प्रतिसाद दिला नाही आणि बऱ्याच दिवसांनी ते कोल्हापुरात आले. आल्यावर त्यांची कशी टर उडवली, सांगली व कोल्हापुरातून त्यांनी कसा काढता पाय घेतला, हे सर्वाना माहित आहे. महापुरात दगावलेल्या जनावरांचाच त्यांना शाप लागला, असा टोलाही मुश्रीफ यांनी यावेळी लावला.

आज भाजपातच भूकंप

राजू शेट्टीनी सांगितले म्हणुन मी पुण्यातून निवडणूक लढलो, नाहीतर कोल्हापुरातून कोणत्याही मतदार संघातून निवडून आलो असतो, असे वक्‍तव्य चंद्रकांतदादांनी केले होते, याबाबत विचारले असता मुश्रीफ यांनी यावर मिश्‍किल हास्य केले. भाजपसारखा पक्ष आज देशात सत्तेत आहे, मात्र कोल्हापुरात त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे चंद्रकांतदादा काय म्हणतात, त्याला मी गांभीर्याने घेत नाही. त्यांना असे बोलायची सवय आहे. बऱ्याचवेळा त्यांनी भूकंप होणार असल्याची घोषणा केली. मात्र आज याच पक्षात भूकंप असल्याचा टोला त्यांनी लगावला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minister hasan mushrif criticized on chandrakant patil on corona situation in kolhapur