मंत्री मुश्रीफ या कारणांसाठी इचलकरंजीचा पाणीप्रश्न समाजावून घेणार

MUSHRIF.png
MUSHRIF.png

मुरगूड / कोल्हापूर : कागल तालुक्‍यातील हक्काच्या पाण्याच्या एकाही थेंबावरही अन्याय होणार नसेल, इचलकरंजी शहरासाठी होणाऱ्या योजनेचे पाणी अडवल्यामुळे आमची गावं, आमच्या जमिनी बुडणार नसतील. ही योजना ते आमच्या हद्दीच्या बाहेर करणार असतील तरच आम्ही इचलकरंजीकरांचा पाणीप्रश्न समजावून घेऊ, असे मत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. 
येथे नगरपरिषदेतर्फे नगरोत्थान महाअभियानमधून 9 कोटींच्या मुरगूड शहर सुधारीत नळ-पाणीपुरवठा योजनेचा प्रारंभ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व खासदार संजय मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्याप्रसंगी मंत्री मुश्रीफ बोलत होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, "आज इचलकरंजीकरांनी निवेदन दिले आहे. ते लोक अद्याप मला भेटलेले नाहीत, पण संजय मंडलिक यांना भेटलेत. स्वच्छ पाणी पिण्याचा आमचा अधिकार आहे की नाही ? आमच्या अनेक पिढ्या प्रदूषित पाणी पिताहेत, पुढच्या ही पिणार आहेत. असे म्हटले आहे. यामुळे मी ही अस्वस्थ झालो.'' 
तत्कालीन पालकमंत्री दिग्विजय खानविलकर यांनी कोल्हापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याबद्दलची घेतलेली भूमिका आणि खासदार सदाशिवराव मंडलिकांनी त्यावेळी स्वच्छ व शुद्ध पाण्यासाठी घेतलेली भूमिका याचा संदर्भ देत मंत्री मुश्रीफ म्हणाले,"आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे गुरू खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या गावी शपथ घेऊन सांगतो की, त्यांनी जी स्वच्छ व शुद्ध पाणी देण्याची जी भूमिका घेतली. ती यापुढे मुरगूडमध्येही ही पार पाडू आणि जिथं आमच्यावर अन्याय होणार नसेल, अशा ठिकाणीही सहकार्य करू. इचलकरंजीकरांच्या पाणी प्रश्नाबाबत मी, खासदार संजय मंडलिक, संजय घाटगे, के. पी. पाटील यांच्यासह सर्वच जण एकत्रित बसून त्यावर निर्णय घेऊ.'' 
खासदार संजय मंडलिक म्हणाले, ""भविष्यातील वाढते शहरीकरण लक्षात घेऊन शहराला पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या सर पिराजीराव या तलावावरील पिण्याच्या पाण्याचा हक्क अबाधित ठेवून ही सुधारीत नळ पाणीपुरवठा योजना येत्या कांही महिन्यात कार्यान्वित होणार आहे. तलाव मालकांनी शेतीपेक्षा पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे.'' 
डी. डी. चौगले, विरेंद्र मंडलिक यांचीही भाषणे झाली. 
नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी स्वागत प्रास्ताविक केले. मारुती कांबळे यांनी आभार मानले. 
कार्यकारी अभियंता डी. के. महाजन, उपअभियंता एस. व्ही. जवळेकर, 
उपनगराध्यक्ष धनाजी गोधडे, पक्षप्रतोद नामदेव मेंडके, विश्वास कुराडे, शामराव घाटगे, आर. डी. पाटील, विजय भोसले, विकास पाटील, जयसिंग भोसले, मुख्याधिकारी संजय गायकवाड आदी उपस्थित होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com