एफसी कोल्हापूर सिटीचे मिशन आयलीग आजपासून

दीपक कुपन्नावर
Friday, 24 January 2020

कोल्हापूर येथील फुटबॉल क्‍लब कोल्हापूर सिटीचे उद्यापासून (ता.24) मिशन इंडियन फुटबॉल लीग (आय लिग) सुरू होत आहे. एफसी कोल्हापूर सिटीला गतवर्षीचा विजेता तामिळनाडूच्या सेतू एफसीसह पंजाब, गुजरात, कर्नाटक आणि मणिपूर या संघाशी मुकाबला करावा लागणार आहे. देशातील अव्वल 12 संघात ही महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा रंगणार आहे. बंगलोर फुटबॉल स्टेडियमवर होणाऱ्या स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. 

कोल्हापूर : येथील फुटबॉल क्‍लब कोल्हापूर सिटीचे उद्यापासून (ता.24) मिशन इंडियन फुटबॉल लीग (आय लिग) सुरू होत आहे. एफसी कोल्हापूर सिटीला गतवर्षीचा विजेता तामिळनाडूच्या सेतू एफसीसह पंजाब, गुजरात, कर्नाटक आणि मणिपूर या संघाशी मुकाबला करावा लागणार आहे. देशातील अव्वल 12 संघात ही महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा रंगणार आहे. बंगलोर फुटबॉल स्टेडियमवर होणाऱ्या स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. 

महिला फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक फुटबॉल महासंघाने (फिफा) आपल्या सर्व सदस्य देशांना सूचना दिल्या आहेत. त्याअंतर्गत पुरूषांप्रमाणेच महिलासाठी राष्ट्रीय साखळी (लिग) स्पर्धा घेण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) गेल्या तीन वर्षापूर्वी या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली. प्रायोगिक तत्त्वावर 10 संघात झालेल्या पहिल्या स्पर्धेत मणिपूरच्या इस्टर्न सपोर्टिंग युनियनने विजेतेपद पटकाविले. दुसऱ्या वर्षी ओरिसाच्या रायझिंग स्टारने तर गतवर्षी तामिळनाडूच्या सेतू एफसीने स्पर्धेचे अजिंक्‍यपद मिळवले आहे. 

दोन वर्षांपूर्वी कोल्हापुरी फुटबॉलपटूंना आय लिग स्तरावर संधी मिळावी म्हणून आमदार चंद्रकांत जाधव यांनी पुढाकार घेऊन फुटबॉल क्‍लब कोल्हापूर सिटीची स्थापना केली. गतवर्षीही महिला स्पर्धेत हा संघ सहभागी झाला होता. गटात तिसरे स्थान मिळाल्याने उपांत्य फेरीचे स्वप्न भंगले. भारतीय महिला फुटबॉल मध्ये मणिपुर, ओरिसा, बंगाल या संघाचे वर्चस्व आहे. मुंबईत गेल्या महिन्यात झालेल्या पात्रता स्पर्धेत विजेतेपद पटकावून या संघाने दिमाखात मुख्य स्पर्धेसाठी पात्रता मिळविली. 

स्पर्धेत सहभागी 12 संघांचे प्रत्येकी सहा याप्रमाणे दोन गटात विभागणी केली आहे. यात कोल्हापूर सिटीसह गुजरातचा बरोडा फुटबॉल अकॅडमी, पंजाबच्या बीबीके डव एफसी, बेंगलोरचा किक स्टार्ट एफसी, मणिपूरचा केआरफिसा आणि सेतू एफसीचा समावेश आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी एफसी कोल्हापूर सिटीला बलाढ्य सेतू एफसी, मणिपूर आणि पंजाबच्या संघांना नमविण्याचा पराक्रम करावा लागणार आहे. यामुळे संघाच्या कामगिरीकडे कोल्हापूर फुटबॉल क्षेत्राचे लक्ष वेधून आहे. 

कसून सराव 
आयलिगसाठी खेळाडूंनी कसून सराव केला आहे. विभागीय स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्याने खेळाडूंचा आत्मविश्‍वास उंचावला आहे. उठावदार कामगिरीची अपेक्षा आहे. 
- आमदार चंद्रकांत जाधव, प्रमूख एफसी कोल्हापूर सिटी 

सामन्यांचे वेळापत्रक 
24 जानेवारी तामिळनाडू सेतू एफसी 
27 जानेवारी पंजाब बीबीके डव एफसी 
30 जानेवारी बेंगलोर किक स्टार्ट एफसी 
3 फेब्रुवारी गुजरात बरोडा फुटबॉल अकॅडमी 
5 फेब्रुवारी मणिपूर केआरफिसा एफसी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mission Indian Football League Start Today Kolhapur Marathi News