खासदार संभाजीराजे यांनी तमाम खासदारांना केले 'हे' आवाहन

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

तामिळनाडू मधील आरक्षण प्रश्‍नांचा सुद्धा अजून निकाल लागला नाही. तरीही तेथील राज्याने दिलेले आरक्षण चालू आहे. 

कोल्हापूर : मराठा आरक्षण विषयी सर्वपक्षीय खासदारांनी मिळून पंतप्रधानांना निवेदन देण्याबाबतचे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकद्वारे केले आहे. महाराष्ट्रातील सर्व राज्यसभा आणि लोकसभा खासदांना त्यांनी विनंती वजा आवाहन केले आहे. 

फेसबुक पोस्ट मध्ये म्हटले आहे, की महाराष्ट्रातील विधान सभा आणि विधान परिषदेने एकमताने मराठा आरक्षण मंजुर केले. ते राज्यात लागू सुद्धा झाले. त्यानंतर काही लोकांनी न्यायालयात धाव धेऊन आरक्षणाला खीळ घालण्याचा प्रयत्न केला. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणावर प्रश्‍न उपस्थित करून ते पुढील निर्णया करीता पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवण्यात आले आहे. हे करत असताना न्यायालयाने शैक्षणिक आणि नोकर भरती मध्ये स्थगिती दिली आहे. दुसऱ्या राज्यातील 50 टक्के पेक्षा जादा असलेल्या आरक्षणाला अशा प्रकारे स्थगिती दिली गेली नसल्याचे दिसून येते. उदा. तामिळनाडू मधील आरक्षण प्रश्‍नांचा सुद्धा अजून निकाल लागला नाही. तरीही तेथील राज्याने दिलेले आरक्षण चालू आहे. 

 

केंद्राने आर्थिक दृष्ट्या मागास वर्गाला 10 टक्के आरक्षण दिले आहे. ते देखिल न्यायालयात आलेले नाही. परंतू केंद्र सरकाराच्या शैक्षणिक आणि नोकर भरतीला स्थगिती देण्यात आलेली नाही. म्हणून मराठा आरक्षणाला न्यायालयाने जी स्थगिती दिली आहे, ती उठवण्यात आली पाहिजे. 

हेही वाचा- सहा जणांनी रचला कट :  वर्चस्व वादातूनच तो हल्ला , तरूण गंभीर जखमी

 माझी सर्वांना विनंती राहील की आपण सर्वांनी मिळून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करूया. जवळपास 33 टक्के च्या वर असलेला हा समाज पूर्णतः दुखावला गेला आहे. मराठा समाजाची आजपर्यंत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी केवळ दिशाभूल केली आहे, असा समज समाजात पसरत आहे. मला असे वाटते की, हा समज दूरुस्त करण्याची वेळ आलेली आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MMP Sambhaji Raje Chhatrapati h appealed to all party MP to submit a statement to the Prime Minister regarding Maratha reservation through Facebook