
मॉलिक्युलर हायड्रोजन निर्मितीची सुलभ प्रक्रिया
डॉ. सुप्रिया पाटील यांचे संशोधन; ऊर्जानिर्मितीचा कमी खर्चिक पर्याय उपलब्ध
कोल्हापूर : जगभरात विविध कारणांमुळे प्रदूषणात मोठी वाढ होत आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय पातळीवर जाहीर केलेल्या अंदाजाप्रमाणे २०२५ मध्ये एक अब्ज लोकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागणार आहे. सध्या १८.१३ टेरावॅट इतकी ऊर्जा जगभरात वापरली जाते. २०४० पर्यंत याचे प्रमाण २४ ते २६ टेरावॅट पर्यंत पोचेल.
पाणीटंचाई आणि ऊर्जानिर्मितीचा नवा पर्याय समोर आणावा लागेल. हाच विचार करून कोल्हापुरातील डॉ. सुप्रिया पाटील हिने वेगवेगळे नॅनोपार्टिकल वापरून मॉलिक्युलर हायड्रोजन (एच २) निर्माण करू शकतो, हे दाखविले आहे. त्यांच्या या संशोधनात त्यांनी प्लॅटिनमऐवजी इतर धातूचा वापर केल्याने ही प्रक्रिया कमी खर्चिक आणि सोपी बनली आहे, हे दाखविले.
हेही वाचा- कामाच्या वेळी मोबाईल स्वीच ऑफ असल्यास होणार थेट कारवाई आढळून -
डॉ. सुप्रिया पाटील या मुळच्या कागल तालुक्यातील हसुर खुर्दच्या. त्यांनी पदवीचे शिक्षण शिवाजी विद्यापीठातून रसायनशास्त्रात केले. पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेताना त्यांना एकलव्य, मल्होत्रा फांऊडेशनच्या स्कॉलरशीप मिळाल्या. त्यानंतर त्यांनी दक्षिण कोरियातील हनयांग विद्यापीठात पी. एचडीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. तेथे ‘इनऑरगॅनिक नॅनोमटेरिअल्स फॉर सोलर सेल’ या विषयातून डॉक्टरेट संपादन केली.
त्यांच्या पीएचडीचा प्रबंध विविध आंतरराष्ट्रीय नियतकालिंकामधून प्रसिद्ध झाला आहे. त्यानंतरही त्यांनी पोस्टडॉक्टरल संशोधन सुरू ठेवले आहे. त्यानंतर त्या दोनंगुंक विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. तेथे त्यांनी ‘सिंथेसिस ऑफ १ डी नॅनोस्टरक्चर अँण्ड मेटल ऑरगॅनिक फ्रेमवर्क फॉर सस्टेनेबल हायड्रोजन प्रोडक्शन’ या विषयात संशोधन सुरू केले आहे. सध्या त्या दक्षिण कोरियातील सेजोंग विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
कोरियातील मराठी लोकांसाठीही पुढाकार
डॉ. सुप्रिया पाटील या संशोधनाबरोबर दक्षिण कोरियात सामाजिक कार्यातही सहभाग घेतात. सध्या त्या दक्षिण कोरियातील मराठी मंडळ, कोरिया या समितीच्या सदस्याही आहेत. या समितीमार्फत त्या कोरियातील मराठी लोकांसाठी कार्य करतात.
संपादन- अर्चना बनगे