मायक्रो फायनान्स कंपन्यांविरोधात रास्ता रोको

गणेश बुरुड
Friday, 23 October 2020

सध्या कोरोनामुळे ग्रामीण भागातील महिलांचा रोजगार गेला आहे. त्यांना संसार चालवणे अवघड झाले आहे. त्यात मायक्रो फायनान्सवाले सक्तीने कर्ज वसुली करीत आहेत.

महागाव : सध्या कोरोनामुळे ग्रामीण भागातील महिलांचा रोजगार गेला आहे. त्यांना संसार चालवणे अवघड झाले आहे. त्यात मायक्रो फायनान्सवाले सक्तीने कर्ज वसुली करीत आहेत. त्यांची वसुली शासनाने लवकरात लवकर थांबवावी. मायक्रो फायनान्सच्या कर्ज माफीसाठी आता आरपारची लढाई छेडणार असल्याचा इशारा माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला. 

महागाव (ता. गडहिंग्लज) येथे मायक्रो फायनान्स कंपन्यांविरोधात रास्ता रोको आंदोलन झाले. जनता दल व मायक्रो फायनान्सविरोधी कृती समितीच्या पुढाकाराने झालेल्या या आंदोलनप्रसंगी खोत बोलत होते. दरम्यान, या आंदोलनामुळे गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावरील वाहतूक सुमारे दीड तास ठप्प होती. दोन्ही बाजूला एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

खोत म्हणाले, ""कोरोनाच्या काळात सरकार उद्योगांना चालना देण्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करीत आहे. या पॅकेजमध्ये मायक्रो फायनान्सवरील कर्ज माफीचा समावेश करावा. त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा करावा.'' माजी आमदार श्रीपतराव शिंदे म्हणाले, ""सरकार उद्योगपती व भांडवलदारांचे कर्ज माफ करते. मग बचत गटातील महिलांचे कर्ज माफ करण्यात काय अडचण आहे. कर्जातून या महिलांची सुटका करावी. सरकारने या महिलांचा अंत पाहू नये.'' 

जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, उपनगराध्यक्ष महेश ऊर्फ बंटी कोरी, प्रशांत पाटील, विद्या कांबळे, संजय रेडेकर यांचीही भाषणे झाली. श्रीशैल पाटील, माजी सरपंच प्रशांत शिंदे, बाळकृष्ण परीट, धीरज देसाई, बापूसाहेब कांबळे, रिजवाना खलिफ, नूरजहॉं सय्यद, संजय कांबळे, वंदना कातकर यांच्यासह महिला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. 

सामूहिक आत्महत्येचा इशारा... 
कोरोना काळात महिलांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे आर्थिक घडी विस्कटली आहे. कोणतेच कर्ज भरणे शक्‍य नाही. याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा. अन्यथा गावा-गावांत सामूहिक आत्महत्या केल्या जातील, असा इशारा आंदोलनस्थळी देण्यात आला.

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Movement Against Micro Finance Companies Kolhapur Marathi News