पशुवैद्यकांचे "अहवाल बंद' आंदोलन

अवधूत पाटील
Thursday, 24 September 2020

कोरोना काळात विमा कवच देण्यासह विविध मागण्यासाठी पशुवैद्यकांनी आजपासून अहवाल देणे बंद केले आहे. एक प्रकारे लेखणी बंद आंदोलनाचाच हा भाग आहे.

गडहिंग्लज : कोरोना काळात विमा कवच देण्यासह विविध मागण्यासाठी पशुवैद्यकांनी आजपासून अहवाल देणे बंद केले आहे. एक प्रकारे लेखणी बंद आंदोलनाचाच हा भाग आहे. मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास सोमवारपासून (ता.28) शेतकऱ्यांच्या दारातील पशुवैद्यकीय सेवा बंद करून फक्त दवाखान्यातच काम केले जाणार आहे. तर त्यानंतर काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

कोरोना प्रादुर्भावाच्या काळातही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे अखंडपणे काम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या दारात जाऊन जनावरांना वैद्यकीय सेवा पुरविली जात आहे. शासनाने कोणतेही वैयक्तिक सुरक्षा साधने पुरविलेली नाहीत. वैद्यकीय सेवा पुरविताना पशुपालकांचा संपर्क येतो. आतापर्यंत राज्यातील 285 अधिकारी, कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत, तर नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काही जण बाधित झाले आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना विमा कवच देण्यासाठी विविध मागण्या केल्या आहेत. मात्र, त्याकडे शासनाकडून दुर्लक्ष केले आहे. 

परिणामी, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी आजपासून अहवाल बंद आंदोलन सुरू केले आहे. शासनाकडून मागविलेली कोणतीही माहिती पुरविली जाणार नाही. या माध्यमातून मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे. सकारात्मक निर्णय झाला नाही, तर सोमवारपासून (ता.28) शेतकऱ्यांच्या दारातील पशुवैद्यकीय सेवा बंद केली जाणार आहे.

केवळ दवाखान्यात ओपीडी सुरू ठेवली जाणार आहे. त्यानंतर पूर्ण काम बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटनेतर्फे दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर आठ लाख 88 हजार पशुधन आहे. पशुवैद्यकांच्या आंदोलनाच्या पवित्र्यामुळे पशुधनाच्या वैद्यकीय सेवेवर परिणाम होणार आहे. 

या आहेत मागण्या... 
- पशुवैद्यकांना विमा कवच, सानुग्रह अनुदान तत्काळ मंजूर करावे 
- विशेष बाब म्हणून लाळ खुरकत फेरी पुढे ढकलण्यात यावी 
- मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर या वैयक्तिक सुरक्षा साधनांचा पुरवठा करावा 
- कोविड 19 आजाराची संपूर्ण वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करावी 
- संसर्ग काळातील विलगीकरणाची स्वतंत्र रजा मंजूर करावी 

शासनाने दुर्लक्ष
कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही जीव धोक्‍यात घालून पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी काम करीत आहेत. विमा कवच देण्यासह विविध मागण्याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आजपासून अहवाल बंद आंदोलन सुरू केले आहे. 
- डॉ. आशिष पाटील, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Movement For Various Demands Of Veterinarians Kolhapur Marathi News