फाटकवाडी लाभक्षेत्र वाढवण्याच्या हालचाली

Movements To Increase Phatakwadi Benefit Area Kolhapur Marathi news
Movements To Increase Phatakwadi Benefit Area Kolhapur Marathi news

गडहिंग्लज : चंदगड तालुक्‍यातील फाटकवाडी मध्यम पाटबंधारे प्रकल्पात दरवर्षी उन्हाळा हंगामाअखेर 42 टक्के पाणी साठा (700 एमसीएफटी) शिल्लक राहतो. हा साठा विनावापर तसाच पडून राहत असल्याने पाटबंधारे खात्यातर्फे त्याचा वापर लाभक्षेत्राबाहेरील शेतीसाठी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या पाण्यात लाभक्षेत्राबाहेरील किमान दोन हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून शासनाला एक ते दीड कोटीपर्यंतचा महसूलही मिळणार आहे.

लाभक्षेत्राबाहेर पाणी देण्याचा निर्णय धोरणात्मक असल्याने पाटबंधारे खात्याने हा प्रस्ताव विभागीय मंडळाकडे पाठविला असून तेथून तो कृष्णा खोरे महामंडळाकडे जाणार आहे. त्याला मंजुरी मिळवण्यासाठी आमदार राजेश पाटील यांचा गतीने पाठपुरावा सुरू आहे. 

प्रकल्पाची पाणी साठ्याची क्षमता 1.55 टीएमसी इतकी आहे. 6936 हेक्‍टर सिंचन क्षमता आहे. यातील 4784 हेक्‍टरला पाणी देणे शक्‍य आहे. परंतु, यातील केवळ सरासरी 2415 हेक्‍टर क्षेत्रच सिंचनाखाली येत आहे. उर्वरित 2369 हेक्‍टर क्षेत्राला पाण्याचा फायदा होत नाही. भौगोलिक परिस्थितीमुळे सर्व लाभधारक शेतकऱ्यांनी उपसा सिंचन योजना राबवल्या नसल्याने हे क्षेत्र पाण्यापासून वंचित राहिले आहे. भविष्यात 4784 हेक्‍टर क्षेत्राला पाणी द्यावे लागणारच आहे. इतक्‍या क्षेत्राला पाणी देऊनही शिल्लक साठा राहतो.

शिल्लक पाण्याचा वापर पूर्णत: होण्यासाठी लाभक्षेत्राबाहेरील 2000 हेक्‍टर क्षेत्रास पाणी देणे शक्‍य आहे. हा प्रयोग राबवल्यास धरणातील पाण्याचा पूर्ण वापर होण्यासह शासनाचा महसूलही वाढणार आहे. लाभक्षेत्राबाहेरील इच्छुक शेतकऱ्यांना पाणी परवाना दिल्यास लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांतून विरोध होण्याचा प्रश्‍नही उद्‌भवणार नाही. 

या पार्श्‍वभूमीवर आमदार राजेश पाटील यांनी शिल्लक पाणी साठा वापरण्याबाबत आग्रही आहेत. गडहिंग्लज व चंदगड तालुक्‍यातील लाभक्षेत्राबाहेरील गरजू गावांना याचा लाभ होणार असून तशी मागणीही विधानसभेत केली आहे. पाटबंधारे खात्याला प्रस्ताव तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली. त्यानुसार चंदगड पाटबंधारेचे उपविभागीय अधिकारी बाबूराव पाटोळे व अडकूर शाखा अभियंता तुषार पोवार यांनी हा प्रस्ताव तयार करून कोल्हापूर विभागीय मंडळाकडे पाठविला आहे. आमदार श्री. पाटील या मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. दोन हजार हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आणून शासनाचा महसूल वाढविण्यासाठी दहा वर्षांकरिता तात्पुरत्या स्वरूपात शेतकऱ्यांना परवाने देण्याची शिफारसही करण्यात आली आहे. 

पाच टीएमसी पाणी कर्नाटकात 
दरवर्षी फाटकवाडी प्रकल्पात साधारण 40 ते 42 टक्के पाणी शिल्लक राहते. यामुळे नव्या पावसात केवळ 58 ते 60 टक्के पाणीच प्रकल्पात आवक होते. प्रकल्प भरल्यानंतर सांडव्यावरून जाणारे किमान पाच टीएमसी पाणी कर्नाटकात जात आहे. शिल्लक पाणी वापरून प्रकल्प रिकामा केल्यास किमान दीड टीएमसी पाणी अडवू शकतो. म्हणजे आपोआप कर्नाटकात वाहून जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com