खासदार माने घराण्यास हा नंबर आहे लकी जाणून घ्या

MP Mane Gharana has this number Lucky Know
MP Mane Gharana has this number Lucky Know

खासदार धैर्यशील संभाजी माने शिवसेनेच्या उमेदवारीवर विजयी झाले. ग्रामपंचायत सदस्य ते लोकसभेच्या खासदारकीचा त्यांचा प्रवास अनोखा ठरलाय. त्यांच्या आई अर्थात माजी खासदार निवेदिता माने राजकारणाच्या मुशीत घडल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर त्या 1999 ला विजयी झाल्या. त्यांच्या सासरवाडीत गाड्यांची कमतरता नव्हती. गाड्यां
च्या नंबरचा पॅटर्न मात्र सेम नव्हता. श्रीमती माने यांनी ऍम्बेसिडरचा 11 क्रमांक घेऊन नवा पायंडा पाडला. पहिल्या विजयानंतर शिक्कामोर्तब केलेला नंबर लकी ठरला. आजवरच्या सर्व गाड्यांवर हाच नंबर कोरला गेलाय. 

बाळासाहेब ऊर्फ राजाराम माने कोलल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाची दिशा ओळखणारे व्यक्तिमत्त्व. इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून ते पाच वेळा विजयी झाले. हा काळ 1977 ते 1991 पर्यंतचा होता. त्यांचा राजकीय वारसा त्यांच्या स्नुषा निवेदिता माने यांच्या हाती आला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची 1999 ला स्थापना केली. या पक्षाच्या उमेदवारीवर माने यांनी लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावले. माने घराण्यातील सुनेला मतदारांनी सत्तेची संधी दिली. त्यांची जन्मतारीख 11 एप्रिल. योगायोगाने त्यांना लोकसभेत बसण्याकरिता 11 क्रमांकाची जागा (सीट) मिळाली. त्यांच्या लेखी 11 या क्रमांकाला विशेष महत्त्व होते. निवडणुकीतील विजयानंतर जनसंपर्कासाठी ऍम्बेसिडरची खरेदी झाली. गाडीच्या नंबरप्लेटवर तोच क्रमांक लिहिला गेला. 

2004 च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी त्यांचे नेतृत्व पुन्हा स्वीकारले. राजकारणातील साडेसातीचा फेरा सुरू होण्यापूर्वी मुलगा धैर्यशील राजकारणात सक्रिय झाले. रुकडी ग्रामपंचायतीचे सदस्य, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य, उपाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे विरोधी गटनेता या पदांची जबाबदारी त्यांनी पेलली. या दरम्यान श्रीमती माने यांच्या जनसंपर्काला पूर्णविराम मिळाला नव्हता. गावागावात गाडीची चाके धावत होती. 11 क्रमांकाची गाडी माने कुटुंबीयांची ओळख झाली. रुईकर कॉलनीतील बंगल्यात नव्या गाड्यांच्या नंबरमध्ये मात्र कोणतीच तडजोड झाली नाही. माने वहिनींच्या गाडीचा नंबर नव्या गाड्यांवर फॉरवर्ड झाला. 
धैर्यशील माने यांनी जिल्हा परिषदेचा परीघ भेदून लोकसभेच्या रणांगणात शड्डू ठोकला. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात त्यांच्या प्रचाराच्या फैरी झडल्या. गावागावांत त्यांच्या गाडीभोवती मतदारांचा घोळका जमायचा. माने आणि 11 नंबरची गाडी हे समीकरण मतदारांत दृढ झाले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतात कोणतीच कसूर ठेवली नाही. निवडणुकीतील विजयानंतर धैर्यशील माने यांच्या चेहऱ्याला गुलाल लागला. त्यांची एमएच -09 सीएम - 11 क्रमांकाची गाडीही गुलालात न्हाऊन गेली. 
विशेष म्हणजे त्यांचे कार्यकर्ते रवींद्र माने यांनी हाच क्रमांक त्यांच्या गाडीसाठी घेतलाय. 
"आईची जन्मतारीख 11 एप्रिल आहे. मी व सत्वशील दोघे भाऊ. दोघांसाठी 1 क्रमांक आहे. तो मिळून 11 अशी त्यांची समजूत आहे. मामे बहीण विराजिनीची जन्मतारीखही 11 आहे. तसेच आईंना लोकसभेतील पहिल्या निवडणुकीनंतर बसण्याची जागा अकराव्या क्रमांकाची मिळाली होती. हा नंबर आमच्यासाठी लकी ठरलाय,' असे खासदार धैर्यशील माने सांगतात. 

संपादन - यशवंत केसरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com