कर्नाटकातील 'या' नेत्याला 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा होतोय दावा...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 June 2020

राज्यसभा निवडणूक 19 जूनला आहे. त्याबात अध्यादेश जारी आहे. सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून, त्यापैकी चार जागा कर्नाटकातील आहेत.

बेळगाव - खासदार प्रभाकर कोरे यांनी शिक्षण व वैद्यकीय क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. त्यासाठी पक्षाकडून दोनवेळा उमेदवारी देण्यात आली. आताही त्यांना उमेदवारी देण्याचा सूर कायम आहे. उत्तर कर्नाटकातील 30 हून अधिक आमदार त्यांच्या पाठीशी आहेत, असे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी सांगितले.

बेळगाव, बागलकोट आणि विजापूरमधील आमदारांनी मुख्यमंत्र्यांना दिले पत्र

उपमुख्यमंत्री सवदी आज (ता.2) बेळगाव दौऱ्यावर होते. यावेळी राज्यसभा निवडणूक आणि डॉ. कोरे यांच्या उमेदवारीबाबत विचारणा केली. यावेळी आमदारांचा मोठा समूह कोरे यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले. बेळगाव, बागलकोट आणि विजापूरमधील आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन कोरे यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले आहे. शिवाय सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. भाजप म्हणजे पार्टी विथ डिफरन्स. त्यामुळे उमेदवारांची चाचपणी आणि अंतिम उमेदवारी निवड पक्षश्रेष्ठी करतात, असेही सवदी यांनी सांगितले.

सवदी पुढे म्हणाले,"आमदारांच्या पाठबळ संदर्भात मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना कल्पना आहे. विजापूरला स्नेहभोजन होते. त्याला कत्ती बंधू उपस्थित होते. त्यामागे राजकीय हेतू नाही. खूपदा कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याला गटबाजी, छुपा अजेंडा अशी नावे देणे योग्य नाही.''

वाचा - ऊस शेतकरी पंतप्रधानांचे साता-जन्माचे वैरी आहेत काय? मंत्री मुश्रीफ यांचा पंतप्रधानांना प्रश्न

19 जूनला निवडणूक

राज्यसभा निवडणूक 19 जूनला आहे. त्याबात अध्यादेश जारी आहे. सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून, त्यापैकी चार जागा कर्नाटकातील आहेत. सध्या राज्यसभा सदस्य म्हणून राजीवगौडा एम. व्ही., बी. के. हरिप्रसाद (कॉंग्रेस), प्रभाकर कोरे (भाजप) आणि डी. कुपेंद्र रेड्डी आहेत. त्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यासाठी तिन्ही पक्षांकडून उमेदवारी चाचपणी सुरु आहे. राज्यात भाजपची सत्ता आहे. 117 आमदार आहेत. यामुळे 2 जागांवर कमळ सहज फुलेल, असा दावा केला.

उमेदवारीसाठी चुरस

आमदार उमेश कत्ती यांनी बंधू रमेश कत्ती यांच्यासाठी फिल्डिंग लावली आहे. पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. यामुळे उमेदवारीवरून गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये चढाओढ सुरु आहे. धजदतर्फे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, कॉंग्रेसतर्फे मल्लिकार्जुन खर्गे यांना उमेदवारी देण्यासाठी चर्चा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Prabhakar Kore is claimed to have the support of thirty MLAs in karnataka