विवेकच्या कुटुंबाच्या पाठीशी मी स्वतः ठामपणे उभा रहाणार : खासदार संभाजीराजे छत्रपती

सकाळ वृत्तसेवा
Friday, 2 October 2020

राहाडे कुटुंबीयांची काळजी घ्या मी लवकरच तुमच्या भेटीला

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या मराठा शहिद विवेक रहाडे यांच्या कुटुंबाचे खासदार संभाजीराजे  छत्रपती यांनी फोन करून  आज सांत्वन केले. विवेकच्या आत्महत्येने मला खूप दुःख झालं आहे. मी महाराष्ट्र भर फिरतोय जर मी विश्वास देऊ शकलो नाही तर माझा उपयोग काय..? संपूर्ण समाज आणि मी स्वतः ठामपणे विवेकच्या कुटुंबाच्या पाठीशी उभा रहाणार आहे. असे संभाजीराजे यांनी  कुटुंबीयांशी बोलताना भावना व्यक्त केल्या.

 

यावेळी गावकऱ्यांशी बोलताना संभाजीराजे म्हणाले, तुम्ही राहाडे कुटुंबीयांची काळजी घ्या मी लवकरच तुमच्या भेटीला  येईन.  संभाजीराजे यांना गावकऱ्यांनी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा अशी मागणी केली.

मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर याचे पडसाद राज्यभर उमटले असतानाच  एका शेतकऱ्याच्या मुलाने आत्महत्या केली .यावर खासदार संभाजीराजे यांनी  मराठा समाजाला आवाहन केले होते.एक लक्षात ठेवा हा समाज, "लढून मरावं, मरून जगावं" हेच आम्हाला ठावं, असे पोवाडे गाणारा आहे. माझ्या शूर सरदारांनो खचून जाऊ नका. आज परिस्थिती जरी आपल्या विरोधात वाटत असली, अंधारात जात असलेली वाटत असली तरी, उद्या नक्की पहाट होईल. सर्व काही ठीक होईल. आपण लढाई जिंकूंच!  माझ्या निडर वाघांनो तुम्हीच जर असे हातबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगलं वाटणार आहे का? या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा आहे.  सर्वांना माझी नम्र विनंती आहे कोणीही असे पर्याय निवडू नयेत. असे काल त्ंयानी ट्विट केले होते.
 
  विवेक राहाडे या युवकाने समाजासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. घरातील कर्तृत्वाला आलेला युवक असा अकाली जाणं, ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे.  समाजासाठी बलीदान दिलेल्या या मावळ्याला माझी विनम्र श्रध्दांजली! असेही त्यांनी ट्विट केले होते.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sambhaji Raje Chhatrapati called Vivek Rahade family and consoled them