
आता काकांनी दादांचा आग्रह मोडावा, हे भाजपमध्ये चर्चेला फोडणी देणारे ठरले नसते तर नवल !
सांगली : भाजपच्या कोअर कमिटीची बैठक रविवारी दुपारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या वसंत बंगल्यात झाली. या बैठकीनंतर जेवण सुरु असतानाच खासदार संजयकाका पाटील तेथे आले. तेथून काही मिनिटांत ते बाहेर पडले... त्यांनी गाडीत बसताना दरवाजा जोरात ओढून घेतला की आदळला...? प्रश्नचिन्ह आहेच... पण, या साऱ्यात चंद्रकांतदादांनी संजयकाकांना "या काका दोन घास खावून घ्या', असे प्रेमाने निमंत्रण दिले होते. ते संजयकाकांना स्विकारले नाही आणि ते लगेच निघून गेले. हे मात्र घडले.
आता काकांनी दादांचा आग्रह मोडावा, हे भाजपमध्ये चर्चेला फोडणी देणारे ठरले नसते तर नवल !त्याचे घडले असे, की चंद्रकांतदादा सांगलीला येणार होते पत्रकार परिषद घ्यायला. केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रमुख नेत्यांना एकेक जिल्हा वाटून देण्यात आला होता. चंद्रकांतदादांच्या वाट्याला आला सांगली जिल्हा. ते अशा मुहुर्तावर आले की मूळ विषय राहिला बाजूला आणि त्यात महापौर निवड, जिल्हा परिषदेतील बदलाची मागणी अशी फोडणी मिळाली. त्यामुळे दादांनी अख्खा दिवस सांगलीसाठी काढला.
दुपारी बारा वाजता कोअर कमिटीची बैठक सुरु झाली. त्यात संजयकाका आहेतच, मात्र ते वेळेत आले नाहीत. बैठक संपल्यानंतर ते आले. तो पर्यत चंद्रकांतदादा जेवायला बसले होते. सोबत जिल्ह्यातील भाजप नेते होते. त्यापैकी एका नेत्याने आँखो देखी सांगितले.त्यानुसार, संजयकाका आत आले आणि त्यांचा दादांशी नमस्कार-चमत्कार झाला. दादांनी संजयकाकांना "या काका दोन घास खावून घ्या', असे निमंत्रण दिले. परंतू, संजयकाका नेहमीसारखेच घाईत होते.
सकाळपासून बाहेर आहे, तुम्ही जेवून घ्या, मला एक महत्वाचे काम आहे, असे सांगून ते बाहेर पडले. ते बाहेर पडत असताना त्यांनी कारचा दरवाजा जोरात आदळला, अशी चर्चा आहे. तो आदळला असेल तर कशासाठी? असेही तर्क वितर्क लढवले जात आहेत. त्यात महापौर निवडीतून संजयकाकांनी सूचवलेले नाव स्पर्धेतून बाहेर पडले आहे का? जिल्हा परिषदेत बदलाबाबत संजयकाकांच्या भूमिकेच्या उलटी भूमिका कोअर कमिटीने घेतली आहे का? असे प्रश्न उरतात. अर्थात, या दोन्ही विषयांवरील निर्णय घ्यायची घाई भाजपने काल केलेली नाही, असे ज्येष्ठ नेते सांगतात. त्यामुळे संजयकाकांनी दार आदळले, याचे उत्तर गुलदस्त्यात आहे.
हेही वाचा -आयत्या बिळावर नागोबा : पाटील यांचा कसला पुरुषार्थ ?
दुसरीकडे आज संजयकाकांनी "मी भाजपमध्येच आहे' याचा पुनरुच्चार केला. त्यांची राष्ट्रवादीशी आणि पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी जवळीक वाढली आहे. त्यामुळे ही चर्चा नेहमीच होत आली आहे. या घडीला संजयकाकांनी पक्षांतर करावे किंवा गडबड करावी, असे कुठलेच रणांगण समोर नाही. त्यामुळे अशा चर्चा आणि दारांची आदळआपट होत असते.
संपादन- अर्चना बनगे