कोल्हापुर परिमंडलातील वीजबिलांची थकबाकी ९६८ कोटी; घरगुती ग्राहकांकडे १५७ कोटी

शिवाजी यादव
Saturday, 21 November 2020

राजकारणामुळे कोंडी; घरगुती ग्राहकांकडे १५७ कोटी रुपये थकीत

कोल्हापूर: कोरोना लॉकडाउन काळात वाढून आलेली वीजबिले माफ करावीत, अशा मागणीसाठी आंदोलन होत आहे. चार महिन्यात अनेक ग्राहकांनी बिलेच भरली नाहीत, त्यामुळे कोल्हापूर परिमंडलातील जवळपास सर्व शाखांची ९६८ कोटीची थकबाकी आहे. यात घरगुती बिलांची जवळपास १५७ कोटी थकबाकी आहे. ही बिले माफ करण्याची मागणी आहे; मात्र शासनाने निर्णय अंतिम निर्णय घेतला नसल्याने बिलांबाबत संभ्रमावस्था आहे.
 

लॉकडाऊनमध्ये मार्च, एप्रिल व मेमध्ये अनेक उद्योग, व्यवसाय बंद राहिले. कामगार स्थलांतरीत झाला. अनेकांचे रोजगार हिरावले. अशातच अनेकांकडे पैसे नाहीत अशात महावितरणने रीडिंग न घेता सरासरी काढून बिले पाठवली. यातच दरवाढही लागू केली. त्यामुळे बिलांचा आकडा फुगला तेव्हापासून वीज बिले माफ करावीत अशी मागणी होत आहे. शासनाने घरगुती वीज बिल माफीच्या मागणीकडे फारशा गांभीर्याने निर्णय न घेतल्याने अद्यापि बिले माफ होणार की, नाही याबाबत अनभिज्ञता आहे. अनेक ग्राहकांनी बिले न भरल्याने थकबाकीचा आकडा 
वाढला आहे.

कोल्हापुरात वीज दरवाढविरोधी कृती समिती स्थापन आहे. वीज बिले माफ व्हावीत यासाठी आंदोलनही सुरू आहे. यात वीज ग्राहक संघटना व इरिगेशन फेडरेशनही सहभागी आहेत. अद्यापि घरगुती बिलांबाबत माफीचा अंतिम निर्णय झालेला नाही.

जिल्ह्यातील वीज बिलांची थकबाकी
 घरगुती ग्राहक ः थकबाकी १५७ कोटी 
 वाणिज्य ग्राहक ः ५२ कोटी ५८ लाख 
 औद्योगिक ः ८५ कोटी ५५ लाख  
 शेती पंप ः ४३८ कोटी ९६ लाख 
 सार्वजनिक पाणी पुरवठा ः ७५ कोटी ८१ लाख  
 पथदिवे ः ५८ कोटी १३ लाख 
 सार्वजनिक सेवा ः ४ कोटी 
 उच्च दाब ः ९२ कोटी ३४ लाख 
 एकूण : ९६८ कोटी

 

५८ टक्के वीज ग्राहकांनी बिले भरली आहेत. कोरोनाकाळात आर्थिक ताण आला असेल त्यामुळे एकाच वेळी अनेकांना वीज बिल भरता येणे शक्‍य नसेल अशांना तीन हप्त्यांत बिल भरता येणार आहे. वीस किलोवॉटच्या आत किंवा वर ज्यांची जोडणी आहे त्यांची बिलेही हप्त्यांनी भरता येतील. त्यासाठी हप्ते देण्याचे अधिकार सबडिव्हिजन व कार्यकारी अभियंत्यांने दिले आहेत. हप्ते वेळीच भरल्यास व्याजमाफी देण्यात येणार आहे.
- प्रभाकर निर्मळे, मुख्य अभियंतास महावितरण

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: msedcl 968 crore arrears of almost all branches in Kolhapur circle