
त्यांच्या कविता आणि गाण्यांच्या आजवर प्रकाशित झालेल्या पुस्तकांची संख्या आहे तब्बल २१.
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक मंडळाने प्रबोधनाची आणि सामाजिक उपक्रमांची परंपरा जपली. त्याच वेळी साहित्यातही काहींनी आपला वेगळा ठसा उमटवला. ही यादी काढायची म्हटलं तर तशी फार मोठी होईल; पण त्यातही महापालिकेत सफाई कामगार म्हणून इमानेइतबारे सेवा बजावत तीन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कवी विजय शिंदे यांचाच प्रातिनिधीक विचार केला तर महापालिकेवर त्यांनी पोवाडाही लिहिला आणि सेवानिवृत्तीनंतर आता थेट पाईपलाईनवर लावणीही लिहिली आहे.
विजय शिंदे १९८१ मध्ये महापालिकेत सफाई कामगार म्हणून रुजू झाले. शहरातील विविध ठिकाणी भल्या पहाटे त्यांचं काम सुरू व्हायचं. हे काम करता करता त्यांना भोवतालातील विविध गोष्टींवर अभिव्यक्त व्हावं, असं वाटायचं आणि म्हणूनच मग त्यांनी कविता, गाणी लिहायला सुरवात केली. त्यांच्या कविता आणि गाण्यांच्या आजवर प्रकाशित झालेल्या पुस्तकांची संख्या आहे तब्बल २१.
हेही वाचा - भविष्यात रेल्वे अंतराळी धावू शकते, डॉ. परशराम शिरगे यांचा सहा नव्या अतिसुवाहकाचा शोध
शिंदे गाणी, कविता करायचे. त्या महापालिकेच्या स्मरणिका असोत किंवा इतर ठिकाणीही प्रसिद्ध व्हायच्या. त्यातील प्रत्येक शब्द प्रत्येकाला अंतर्मुख व्हायला लावायचा. कारण अस्सल बोलीभाषेत ते कविता, गाणी लिहायचे. नव्हे, अजूनही त्यांचे हे लिखाण सुरूच आहे. महापालिकेच्या सेवेत असताना त्यांची ड्यूटी ठरलेली असायची. दुपारी दोनपर्यंत गटारे स्वच्छ करण्यापासून घंटागाडी ओढण्यापर्यंत त्यांचं काम ठरलेलं असायचं. त्यानंतर मग कुठे कविसंमेलन, शाहिरी कार्यक्रम अशा सार्वजनिक कार्यक्रमांना ते हजेरी लावत. आपल्या कविता ते दुसऱ्यांना ऐकवत. अनेकदा काही जणांकडून त्यांना अपमानही सहन करावा लागला; पण हा कवी त्यामुळं कधी डगमगला नाही. त्यांच्या लिखाणाचा प्रवास सुरूच राहिला.
शिंदे यांनी वर्तमानावर भाष्य करणाऱ्या कविता लिहिल्याच; त्याशिवाय शिव-शाहू-फुले- आंबेडकर, अण्णा भाऊंचे विचार घराघरांत पोचले पाहिजेत, ही भूमिका घेऊनही त्यांनी अनेक गाणी लिहिली. त्यांची पुस्तके प्रकाशित करण्यासाठी महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबरच शहरातील विविध संस्थांनीही नेहमीच पाठबळ दिले. त्यांच्या या एकूणच कार्याबद्दल विविध पुरस्कारांनीही त्यांना गौरवण्यात आलं आहे. सध्या ते अहिल्याबाई होळकरनगरात मुलीकडे राहतात.
पाईपलाईन थेट..!
शिंदे महापालिकेवर लिहिलेल्या पोवाड्यात म्हणतात,
‘एकोणीसशे बहात्तर साली, महापालिका झाली, कोल्हापुरास शोभा आली, करीते शहराचे नंदनवन, दिसते चोहीकडे आनंदवन...’
सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी थेट पाईपलाईनवर नवीन लावणी लिहिली आहे. त्यात ते लिहितात,
‘नवीन योजना आलीया सजना, बघा जरा न्याहाळून नीट, टाका तुम्ही पाईपलाईन थेट...’
हेही वाचा - शेती क्षेत्रात आपली वेगळी छाप उमटावी म्हणून अक्षय शेतात नव-नवे प्रयोग करत आहे
"छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू असोत किंवा महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर; त्यांच्या नावाचा आपण केवळ जयजयकार करतो; मात्र त्यांचा विचार बाजूलाच राहतो. नेमक्या याच गोष्टींवर प्रहार करणाऱ्या अनेक कविता व गाणी कवी विजय शिंदे यांनी लिहिली आहेत. सफाई कामगार म्हणून काम करतानाही त्यांनी आपलं हे विद्रोही व्यक्तिमत्त्व या माध्यमातून जपले."
- शाहीर दिलीप सावंत