मनपाचे प्रभाग होणार अपडेट 

Municipal ward will be updated
Municipal ward will be updated

कोल्हापूर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शहरातील प्रभागांची संख्या 2011 च्या जनगणनेवरच निश्‍चित केली जाणार असल्याने ती संख्या वाढण्याची शक्‍यता कमी आहे. तसेच 2015 मध्ये केलेल्या प्रभाग रचनेतही बदल होणार नाही; तथापि भौगोलिक सलगता राहण्याच्या दृष्टीने काही प्रभाग अपडेट केले जाण्याची शक्‍यता आहे. 

दरम्यान, महापालिका निवडणुकीची तयारी मार्चपासून सुरू केली जाणार आहे. यात मागील निवडणुकीतील आरक्षणे पाहून आरक्षण चक्रानुक्रमे फिरविणे, अनुसूचित जाती, जमातीसाठी आरक्षित प्रभाग निश्‍चित करणे, विविध आरक्षित प्रभागांच्या सोडती काढणे, सर्वसाधारण प्रभाग खुले करणे ही कामे टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात येतील. राज्य निवडणूक आयोगाचा दौरा मार्च किंवा एप्रिलमध्ये झाल्यानंतरच या कामांना गती येणार आहे. 

महापालिकेची निवडणूक ऑक्‍टोबर अथवा नोव्हेंबरमध्ये होणार आहे. या निवडणुकीसाठी इच्छुकांनी तयारीला सुरवात केली आहे. प्रभागात संपर्क वाढविण्याचे उमेदवारांचे प्रयत्न सुरू आहेत. पण आरक्षण कोणते पडेल, प्रभाग सर्वसाधारण खुला होईल की महिलांसाठी आरक्षित होईल, याची उत्सुकता इच्छुक उमेदवारांना आहे. त्यादृष्टीने सर्व तयारी करण्यासाठी उमेदवार धडपडत आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनानेही 3 जानेवारीला एक आदेश काढून महापालिका निवडणुका कशा घ्याव्यात, याबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्य निवडणूक आयोगाला दिल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसारच आता या निवडणुका होणार आहेत. 

आरक्षण चक्रानुक्रमे फिरविणार 
आरक्षण चक्रानुक्रमे फिरविण्यासाठी 2020 मध्ये होणारी महापालिकेची ही चौथी निवडणूक आहे. त्यामुळे 2005, 2010, 2015 मध्ये असलेले प्रभागांचे आरक्षण लक्षात घेऊनच या निवडणुकीत आरक्षण चक्रानुक्रमे फिरविण्यात येणार आहे. यासाठी एखाद्या प्रभागात मागील निवडणुकीत कोणते आरक्षण होते, हे पाहूनच आरक्षण सोडत काढण्यात येईल. 

अनुसूचित जातीचे प्रभाग निश्‍चित करणे 
महापालिका क्षेत्रातील अनुसूचित जातीच्या लोकसंख्येची टक्केवारी ज्या प्रभागात सर्वाधिक आहे त्या प्रभागापासून सुरवात करून उतरत्या क्रमाने सर्व प्रभाग लावावे लागणार आहेत. त्यानंतर यापूर्वीच्या निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेले प्रभाग वगळण्यात येतील. त्यानंतर अनुसूचित जातीसाठी असलेल्या जागा, उर्वरित प्रभागातील अनुसूचित जातीची टक्केवारी सर्वाधिक असलेल्या प्रभागापासून सुरवात करावी, असे आदेशात म्हटले आहे. अनुसूचित जमातीचे प्रभाग निश्‍चित करतानाही अशीच पद्धत आहे. 

अशी होणार निवडणूक तयारी 

- प्रारूप प्रभागांची रचना करणे 
- आरक्षण चक्रानुक्रमे फिरविण्यासाठी मागील आरक्षणांची माहिती संकलित करणे 
- अनुसूचित जाती व जमातीसाठी आरक्षित प्रभाग निश्‍चित करणे 
- प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता देणे 
- नागरिकांचा मागासवर्ग, प्रवर्ग व महिला, अनुसूचित जाती, जमाती नागरिक, महिलांसाठी आरक्षण सोडत काढणे 
- प्रभाग रचना प्रसिद्ध करणे 
- प्रभाग रचनेवर आलेल्या हरकती व सूचनांची सुनावणी घेणे 
- हरकती व सूचना विचारात घेऊन अंतिम प्रभाग रचना तयार करणे 
- अंतिम प्रभाग रचनेस मान्यता घेऊन प्रसिद्ध करणे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com