स्वभावाप्रमाणे मुश्रीफ बोललेत...मी काही बोलणार नाही.... 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

कोणावर टीका करणार नाही, असे हसन मुश्रीफ यांनी काही दिवसांपूर्वी ठरवले होते. परंतु, ते त्यांच्या स्वभावात बसत नाही. 

कोल्हापूर : कोणावर टीका करणार नाही, असे हसन मुश्रीफ यांनी काही दिवसांपूर्वी ठरवले होते. परंतु, ते त्यांच्या स्वभावात बसत नाही. त्यामुळे स्वभावाप्रमाणे ते बोललेत; पण मी त्यांच्याप्रमाणे आठ दिवसांत बदलत नाही. त्यामुळे मुश्रीफांवर काही बोलणार नाही, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. 

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पडळकरांचे बोलवते धनी फडणवीस आणि चंद्रकांत पाटील आहेत, अशी टीका केली. याबाबत प्रसारमाध्यमांनी चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, "मुश्रीफ यांनी कोणावरही बोलणार नाही, असे काही दिवसांपूर्वी सांगितले. मात्र, ते त्यांच्या स्वभावात बसत नाही. त्यामुळे ते स्वभावाप्रमाणे आज पुन्हा बोलले; पण मी त्यांच्याप्रमाणे आठ दिवसांत बदलत नाही. म्हणून मुश्रीफांवर काही बोलणार नाही,' असा प्रतिटोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. 

राजकीय संस्कृतीबद्दल पाटील म्हणाले, ""आम्ही कोणाच्या धमक्‍यांना घाबरत नाही. आरोप-प्रत्यारोपांची सुरुवात कोणी केली हे महत्त्वाचे नाही. चंपा किंवा टरबूज म्हटलेले कसे चालते? जे तुम्ही पेराल तेच उगवेल. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडत चालली आहे. एकत्र बसून ती नीट करणे आवश्‍यक आहे; अन्यथा याचा शेवट कुठेही होऊ शकतो.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mushrif spoke as usual ... I will not say anything ....