प्रा.डाॅ.एन.डी.पाटील यांनी 'या' पुस्तकातून मांडल्या शिक्षण, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घ्या...

अमोल सावंत
गुरुवार, 16 जुलै 2020

ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांच्या 92 व्या वाढदिवसानिमित्त प्रा. डॉ.एन.डी.पाटील प्रतिष्ठान आणि राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजतर्फे डॉ.पाटील यांच्या "शेती मालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत', "शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी?' या दोन पुस्तकांचे प्रकाशन सौ. पाटील यांच्या हस्ते झाले.

कोल्हापूर : पुरस्कार आणि पदकापेक्षा डॉ. एन. डी. पाटील यांनी सर्वसामान्यांचे संसार उभे केले, हे करत असताना त्यांनी कोणत्याही फळाची अपेक्षा ठेवली नाही. गेली साठ वर्षे त्यांची पत्नी म्हणून साथसोबत करताना त्यांचे मोठेपण जाणवले, असे प्रतिपादन सौ. सरोज पाटील (माई) यांनी केले. 
ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या 92 व्या वाढदिवसानिमित्त प्रा. डॉ. एन. डी. पाटील प्रतिष्ठान आणि राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजतर्फे डॉ. पाटील यांच्या "शेती मालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत', "शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी?' या दोन पुस्तकांचे प्रकाशन सौ. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. राजर्षी शाहू महाविद्यालयात हा कार्यक्रम झाला. 
कार्यक्रमाला डॉ. जे. एफ. पाटील, डॉ. भालबा विभुते, डॉ. एम. बी. शेख, प्राचार्य डॉ. जी. पी. माळी, प्रसाद कुलकर्णी, व्यंकाप्पा भोसले, निहाल शिपूरकर, विक्रांत पाटील-किणीकर आदी उपस्थित होते. 
"शेती मालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत' या पुस्तकाबद्दल बोलताना डॉ. जे. एफ पाटील म्हणाले, ""डॉ. एन. डी. पाटील यांनी 50 वर्षांपूर्वी लिहिलेल्या पुस्तकात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, शेतमालाच्या किफायतशीर किमतीवर जी कैफियत मांडली. ती आजच्या काळातही लागू होते. शेतीच्या प्रश्नांना योग्य न्याय मिळत नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती आजही चिंताजनक आहे.'' 
"शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी?' या पुस्तकाबाबत डॉ. विभुते म्हणाले, ""बहुजनांच्या, सर्वसामान्यांच्या शिक्षणाची परवड आजही थांबली नाही. आज ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षणाची तफावत त्यांनी या पुस्तकाच्या निमित्ताने मांडली,'' असे विवेचन केले. 
प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. शेख, समाजप्रबोधिनी इचलकरंजीचे श्री. कुलकर्णी यांनी कार्याला उजाळा दिला. पुस्तक प्रकाशनासाठी रवी जाधव यांनी सहकार्य केले. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल डॉ. एम. बी. शेख यांचा सौ. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठानचे कार्यवाह प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. एस. टी. साळुंखे यांनी आभार मानले. 

संपादन - यशवंत केसरकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: N. D. Patil's book on education, the plight of farmers