कोल्हापुरात शरीरसौष्ठवपटूंत ‘कहीं खुशी कहीं गम’

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 7 October 2020

‘नाडा’कडून खासगी स्पर्धांना बंदीचे पत्र; खेळाडू वंचित

कोल्हापूर : नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने (नाडा) खासगी शरीरसौष्ठव स्पर्धांवर बंदी घातल्याने जिल्ह्यातील शरीरसौष्ठवपटूंत ‘कहीं खुशी कहीं गम’चे चित्र आहे. इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनला नाडाने खासगी स्पर्धांवरील बंदीचे पत्र पाठविले आहे. 

केवळ अधिकृत स्पर्धांत सहभाग घेणाऱ्यांना नोकरी व पुरस्काराची हमी, तर खासगी स्पर्धेतील स्पर्धकांच्या आर्थिक कमाईला ठेंगा मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अनधिकृत स्पर्धांत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांवर विचार करण्याची वेळ आली आहे.  राज्यभरात खासगी शरीरसौष्ठव स्पर्धांचे पेव फुटले आहे. 

हेही वाचा- नॉस्ट्रॅडेमस यांची  भविष्यवाणी 

आर्थिक कमाई होत असल्याने प्रोफेशनल शरीरसौष्ठवपटू त्यात सहभागी होतात. त्यातून त्यांच्या आहाराचा खर्च भागतो. तसेच उत्तेजक पदार्थांतून त्यांचे डोपिंगमध्ये प्रमाणही वाढते. त्याला चाप बसावा, यासाठी नाडाने खासगी स्पर्धांवर हातोडा मारला आहे.  जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील स्पर्धांना मान्यता दिली जाते. वर्षाकाठी किमान वीसहून अधिक या स्पर्धा होतात. ग्रामीण भागात काही खासगी स्पर्धाही होतात.

हेही वाचा- आठ वर्षांनंतर जोतिबाच्या पायथ्याशी पुन्हा बिबट्याचा वावर -

खासगी स्पर्धांतून आर्थिक कमाई जरूर होते; पण त्यातील प्रमाणपत्राचा काडीचाही उपयोग होत नाही. त्यामुळे या स्पर्धांत भाग घेऊन काहीच उपयोग होत नाही. शरीरसौष्ठवपटूचे भविष्य त्यातून घडत नाही. परिणामी केवळ अधिकृत स्पर्धेत शरीरसौष्ठवपटूंनी भाग घेणे हिताचे ठरते. 
- विजय मोरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेता.

अधिकृत संघटनांतर्फे स्पर्धा होणे आवश्‍यक आहे. खेळाडूंचे नुकसान त्यातून होणार नाही. त्यांना इंटरनॅशनल, अशियाई स्पर्धांत सहभागी होता येईल. तसेच नोकरीची हमी मिळेल. अनधिकृत स्पर्धांत सहभाग घेऊन त्यांचे नुकसान होते, ते टळेल. नाडाने घेतलेला निर्णय चांगला आहे. 
- दुर्गाप्रसाद दासरी, वर्ल्ड कास्यपदक विजेता.  

 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NADA has sent a letter to the Indian Bodybuilding and Fitness Federation banning private competitions