
महापालिकेच्या इमारतीत रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी राष्ट्रध्वज फडकवणे आणि सूर्यास्तावेळी तो उतरवून पुन्हा सुरक्षित ठेवणे, ही कामे आजवर महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी केली.
कोल्हापूर : महापालिकेच्या इमारतीत रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी राष्ट्रध्वज फडकवणे आणि सूर्यास्तावेळी तो उतरवून पुन्हा सुरक्षित ठेवणे, ही कामे आजवर महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी केली. मुळात राष्ट्रध्वजाची ही जबाबदारी म्हणजे तशी मोठी जोखमीची. ध्वज संहितेतील सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत पालन करतच ही जबाबदारी पार पाडावी लागते; पण महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ही जबाबदारी नेहमीच चोखपणे पार पाडली. सध्या हे जबाबदारीचं काम विक्रांत वासुदेव अगदी इमाने-इतबारे पार पाडत आहेत.
सर्वसामान्य नागरिकांना २००२ पर्यंत स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाशिवाय राष्ट्रध्वज फडकवण्याची परवानगी नव्हती. २००२ पासून ध्वज संहितेतील मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करत सामान्य नागरिकांना परवानगी देण्यात आली; मात्र महापालिकेसारख्या सरकारी आस्थापनांवर रोज राष्ट्रध्वज फडकवला जातो. कोल्हापूर महापालिकेचाच विचार केला तर हे जबाबदारीचं काम यापूर्वी अनेक कर्मचाऱ्यांनी चोखपणे पार पाडलं. कारण राष्ट्रध्वजाचा कोणत्याही प्रकारे अवमान होणार नाही, याची खबरदारी घेत ही जबाबदारी पार पाडावी लागते. गेली काही वर्षे विक्रांत हे काम चोखपणे करत आहेत.
विक्रांत राहायला उत्तरेश्वर पेठेतील विठोबा मंदिर परिसरात. त्यांचे वडील महापालिकेचे कर्मचारी. वडिलानंतर आई आणि आईनंतर ते अनुकंपा तत्त्वावर महापालिकेत पहारेकरी म्हणून रूजू झाले. ती तारीख होती ११ फेब्रुवारी २००४. राष्ट्रध्वज कसा बांधतात, ध्वजवंदन आणि ध्वज उतरवण्याचे नियम यापासून ते तो बांधताना किती गाठी असाव्यात, याबाबत त्यांना नेहमीच उत्सुकता असायची. त्यामुळे सुरवातीच्या काळात या उत्सुकतेपोटी ते या कामात मदत करू लागले आणि काही महिन्यांनी वरिष्ठांनी ही जबाबदारी त्यांच्याकडेच देऊन टाकली.
हेही वाचा- हातकणंगलेत जनसुराज्यला तीन वर्षात दुसऱ्यांदा संधी
सकाळी सूर्योदयापूर्वी पंधरा ते वीस मिनिटे अगोदर त्यांना महापालिकेत पोचावे लागते. बरोबर सूर्योदयाच्या वेळी राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर त्यांची सायकल थेट शुक्रवार पेठेतील रणशिंग हारवाल्यांच्या घरी पोचते. हे रणशिंग कुटुंब म्हणजे गेल्या पाच ते सहा दशकांपासून हारांचा व्यवसाय करणारे. केवळ शहरातच नव्हे, तर अगदी वडणगे, आंबेवाडीपर्यंत रोज सकाळी हार पोचवण्याची सेवा या कुटुंबांतील सदस्यांनी कैक वर्षे दिली. सध्या या कुटुंबातील सदस्य विविध ठिकाणी नोकरीला असले तरी त्यांचा हा पारंपरिक व्यवसाय आजही सुरूच आहे.
याच रणशिंग यांच्या घरातून हार घेऊन पुन्हा विक्रांत महापालिकेत येतात. तेथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, त्यानंतर दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा, व्हीनस कॉर्नर येथील राजाराम महाराजांचा पुतळा आणि लक्ष्मीपुरीतील आईसाहेब महाराजांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर त्यांची सकाळची जबाबदारी पूर्ण होते.
हेही वाचा-आरटीपीसीआर चाचणीनंतरच शिक्षकांना शाळांमध्ये प्रवेश
सायंकाळी सूर्यास्तापूर्वी पुन्हा काही मिनिटे अगोदर ध्वजस्तंभाजवळ ते हजर होतात आणि सूर्यास्ताच्या वेळी ध्वज उतरवून तो सुरक्षित ठेवतात. रोजच्या जबाबदारीच्या या कामामुळे फारशी सुटी किंवा रजा कधी त्यांना घेता येत नाही; मात्र अगदीच अपवादाच्या वेळी संजय पाटील ही जबाबदारी पार पाडतात. विक्रांत असोत, संजय पाटील असोत किंवा ही जबाबदारी पार पाडणाऱ्या आजवरच्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या योगदानाबाबत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नक्कीच कृतज्ञता व्यक्त होईल, यात शंका नाही.
संपादन- अर्चना बनगे