पंचवीस वर्षापासून पतीचा हात हातात घेऊन दृष्टीहिन पतीचा आधार बनली 'इंदिरा '

प्रकाश पाटील
Wednesday, 21 October 2020

गणपतराव यांच्या मते आपल्या जिवनाचा खरा आधार आपली पत्नी इंदिरा आहे.

कंदलगाव (कोल्हापूर) :  वैवाहिक जिवनात एकमेकांच्या विचाराने निर्णय घेतल्यास संसार सुखाचा होतो म्हणूनच पती-पत्नी संसाराची दोन चाके असतात असे म्हटले जाते.मात्र संसार सुखाचा असतानाच पतीच्या डोळ्यातील मोतीबिंदूच कारण बनून संसाराच एक चाक निकामी झाले आणि पुढे सुरू तो एकाच चाकाचा संसार....

ही कहाणी आहे आयसोलेशन रोडवरील नेहरू नगर येथे राहणारे गणपती सनगरे व त्यांची पत्नी इंदिरा या कुटुबाची. गणपती हे एसटी खात्यात ड्रायव्हर म्हणून नोकरी करीत होते.1994 साली किरकोळ आजारी असताना डोळ्यात मोतीबिंदू झाल्याचे कारण होऊन दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली. मेडिकल अनफिट झाल्याने नोकरीत निवृत्ती घेऊन घरात राहणेच गरजेचे झाले.आणि पुढे सुरू झाला तो इंदिरा या एकाच चाकाचा संसार.

गेल्या पंचवीस वर्षापासून पतीचा हात हातात घेऊन दृष्टीहिन पतीचा आधार बनत पुढचा प्रवास सुरू झाला. गणपती आणि इंदिरा यांना तीन मुलगे. मुलांचे शिक्षण सुरू असतानाच पतीची दृष्टी गेल्याने संसाराचा पुढचा प्रवास कसा करायचा या प्रश्नात न गुरफटता खंबीरपणे आलेल्या परिस्थितीवर मात करून अगदी सावलीप्रमाणे इंदिरा त्यांच्या बरोबर राहिल्या.

हेही वाचा- बेळगावचा हा धबधबा ठरतोय हौशी पर्यटकांचा कर्दनकाळ -

पतीच्या निवृत्तीनंतर मिळालेल्या तुटपुंज्या रक्कमेत पुढील टप्पा गाठणे अवघड असले तरी न खचता पतीच्या विचारांचा आधार घेत आजपर्यतचा प्रवास सुखाचा चालला आहे. रोज सकाळी पहाटे उठून पतीच्या हाताला धरून शेंडा पार्क येथून सुमारे चार कि.मी. चालणे, त्यांचे जेवन खाणे वेळेवर देणे यामुळे वयाच्या ऐंशीव्या वर्षातही एखाद्या तरूणाला लाजवेल अशी चालण्याची शक्ती आजही त्यांच्यात आहे.

गणपतराव यांच्या मते आपल्या जिवनाचा खरा आधार आपली पत्नी इंदिरा आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून अगदी एक तास सुद्धा ती आपल्याला सोडून कुठेही गेलेली नाही. माझी सावलीच आहे ती असे त्यांनी दै.सकाळशी बोलताना सांगीतले. त्यावेळी मात्र त्या माऊलीच्या डोळ्यातून टपणारे अश्रू जीवनातील सुखदुखःची जाणीव करून देणारे होते.आपल्या संसारासाठी दृष्टीहिन पतीसोबत प्रवास करताना आपले पै- पाहूणे,माहेर विसरून पतीला साथ देणारी इंदिरा म्हणजे साक्षात 'दुर्गाच' म्हणावी लागेल. 

संसार सुखाचा असताना पतीला आलेले अंधत्व आयुष्यातील मोठे दु:ख होते.पण खचून न जाता आलेल्या परिस्थितीचा खंबीरपणे सामना केला.आता कोणत्याही संकटाचे भय वाटत नाही.
इंदिरा सनगरे .

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navdurga special indira sangare story by prakash patil kandalgaon