धनंजय मुंडे प्रकरणात आमचा निष्कर्ष बरोबर होता- शरद पवार

सकाळ ऑनलाइन टीम
Friday, 22 January 2021

मुंडे यांच्यावर झालेले आरोप गंभीर होते. मात्र, त्यातील सत्यता पडताळून पाहण्याची गरज असल्याचे मला वाटत होते

कोल्हापूर- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधातील बलात्काराची तक्रार रेणू शर्मा या महिलेने मागे घेतली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी व्हावी हा आमचा निष्कर्ष बरोबर होता, असे त्यांनी म्हटले आहे. मुंडे यांच्यावर झालेले आरोप गंभीर होते. मात्र, त्यातील सत्यता पडताळून पाहण्याची गरज असल्याचे मला वाटत होते, असेही ते म्हणाले. 

ते पुढे म्हणाले की, सत्यता पाहिल्याशिवाय निष्कर्षापर्यंत येऊ नये. मी सुरुवातीला हा गंभीर प्रश्न असल्याचे म्हटले होते. त्यानंतर मी याप्रकरणातील कागदपत्रे पाहिली. अनेक जणांनी या महिलेविरोधात तक्रारी केल्या. आता त्या महिलेने तक्रार मागे घेतल्याचे समजते. त्यामुळे आम्ही या प्रकरणात चौकशी करावी हा आमचा निष्कर्ष बरोबर होता. चौकशी आणि तपास यंत्रणांना त्यांचे काम करुद्यात, असेही पवार यावेळी म्हणाले. 

हेही वाचा- उद्या मला मुख्यमंत्री व्हावं वाटेल, कुणी करणार का? शरद पवारांचा प्रश्न

यावेळी नेत्यांची सुरक्षा कमी करण्यावरुन झालेल्या वादावर आणि केंद्र सरकारकडून होत असलेल्या हस्तक्षेपावर त्यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था हा राज्याचा प्रश्न आहे. केंद्र सरकारने या अधिकारात हस्तक्षेप करु नयेत. पण ते काहीही करु शकतात. त्यांच्या हस्तक्षेपाचे मला आश्चर्य वाटते. सुरक्षेचा अभ्यास वरिष्ठ अधिकारी करतात. त्यांनी सुचवल्यानुसार सुरक्षा कमी करण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय गृहखाते घेते. त्यात कोणीही हस्तक्षेप करत नाही. परंतु, काही लोकांना हे सर्व बरोबर घेऊन जायला आनंद वाटत असतो. मी माझी सुरक्षा कमी करण्याची विनंती केलेली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp chief sharad pawar speaks on dhananjay munde in kolhapur