
ग्राहकांबरोबरच मत्स्योद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
बेळगाव : ग्राहकांना घरपोच ताजे मासे पोचविण्याची अभिनव योजना मत्स्य खात्याने हाती घेतली आहे. ग्राहकांनी ऑनलाईन ऑर्डर दिल्यानंतर मासे घरी पोचविले जाणार आहेत. यामुळे ग्राहकांबरोबरच मत्स्योद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. ही योजना 21 नोव्हेंबरला बंगळूरमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु केली असून पुढील महिन्यात राज्यभर राबविली जाणार आहे.
हेही वाचा - गरज असेल तिथे मी उभा राहीन, मी तुमचाच आहे ; आमदारांनी दिला जनतेला शब्द -
राज्यात मत्स्याहार करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण, विविध कारणांमुळे अनेकांना मासे खरेदीसाठी बाजारात जाता येत नाही. त्यामुळे, मासे ऑनलाईन विक्रीची योजना आखण्यात आली आहे. त्यासाठी मत्स्योद्योग खात्याने एक ऍप विकसित केले आहे. त्यावर माशांचे विविध प्रकार व दरही असतील. त्यावरुन ग्राहकांना घरात बसून आपल्या आवडीनुसार मासे मागविता येणार आहेत. ही सेवा घरपोच असल्याने ग्राहकांचा त्रास वाचणार आहे. तर मत्स्योद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांनाही आपले उत्पादन सहज विक्री करता येईल.
योजनेमुळे राज्यातील मासे विक्री वाढणार आहे. तसेच मत्स्य उलाढालीत कर्नाटक देशात दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानी पोचण्याची शक्यता आहे. या योजनेला 21 नोव्हेंबर रोजी बंगळुरात सुरवात करण्यात आली आहे. तिथे मिळणारे यशापयश पाहून या योजनेचा संपूर्ण राज्यात विस्तार केला जाणार आहे.
राज्यातील मत्स्य उत्पादन वाढ करण्याचीही योजना आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षित मासे विक्रीला प्राधान्य देऊन मासे विक्री व उत्पादन वाढविले जाणार आहे. माशांची मागणी पाहून उत्पादनवाढीसाठी मत्स्योद्योग करणाऱ्यांना आवश्यक त्या सर्व बाबी पुरविल्या जाणार आहेत. तसेच मंगळूर जिल्ह्यात मस्त्य विद्यापीठ स्थापण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय अंकोला, कारवार, उडुपी, शिमोग्यासह म्हैसूरमध्ये नवीन मत्स्य महाविद्यालय सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.
हेही वाचा - विद्यार्थ्यांचा खर्च वाढणार ; बसपाससाठी आता ऑनलाईन नोंदणी सक्तीची -
संपादन - स्नेहल कदम