कॅन्सर रुग्णांना नवसंजीवनी देणारे कोल्हापूरच्या कन्येचे संशोधन

नंदिनी नरेवाडी-पाटोळे
Saturday, 23 January 2021

डॉ. अश्‍विनी साळुंखे यांचे स्पेनमधील विद्यापीठात संशोधन

कोल्हापूर :  कर्करोगावर उपचार करण्यासाठी सध्या किमोथेरपी, रेडिओथेरपी आणि सर्जरी अशा प्रचलित पद्धती आहेत. परंतु, यातून रुग्णांना साईड इफेक्‍टस्‌ सहन करावे लागतात. त्यामुळे रुग्णांना त्रासाला सामोरे जावे लागते. हे टाळण्यासाठी कर्करोगावरील उपचारांसाठी नव्या पद्धतीवर कोल्हापुरातील डॉ. अश्‍विनी भगवानराव साळुंखे यांनी संशोधन केले आहे. मॅग्नेटीक नॅनोपार्टिकल्स फॉर हायपर थर्मिया थेरपीचा वापर करून शरीरातील कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्याची ही पद्धत कॅन्सर रुग्णांसाठी नवसंजीवनी देणारी ठरणार आहे. या उपचार पद्धतीत मॅग्नेटिक नॅनो पार्टिकल्सचा वापर करून ड्रग्ज फॉर्म्युलेशन तयार केले आहे. स्पेनमधील युनिव्हर्सिटी ऑफ सांन्तियागो द कंपोस्टेला या संस्थेतून त्यांनी संशोधन केले.

डॉ. साळुंखे या मूळच्या इस्लामपुरच्या. पलुसमधील जवाहर नवोदय विद्यालयातून त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले. इस्लामपूरमधील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातून भौतिकशास्त्रातून पदवीचे शिक्षण घेतले. शिवाजी विद्यापीठातून एम.एस्सी.चे शिक्षण घेतल्यानंतर डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठातून डॉ. एस. एच. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मॅगनेटिक नॅनोपार्टिकल्स फॉर हायपर थर्मिया थेरपी’ या विषयात संशोधन केले. त्यानंतर त्यांना स्पेनमधील विद्यापीठाने व्हिजिटिंग सायंटिस्ट म्हणून संशोधनाची संधी दिली. या संधीचे सोने करीत त्यांनी कर्करोगावरील उपचारपद्धतीबाबत सलग तीन वर्षे संशोधन केले.

हे संशोधन सध्या अंतिम टप्यात असून प्राण्यावरील प्रयोग यशस्वी झाला आहे. या संशोधनानंतर त्यांना भारत सरकारच्या सायन्स अँण्ड टेक्‍नॉलॉजी विभागाकडून गौरविण्यात आले. त्यांच्या संशोधनाचे सादरीकरण नेदरलॅंडमध्ये करण्यासाठी ट्रॅव्हल सपोर्ट देण्यात आला. तसेच त्यांना पुणे विद्यापीठात संशोधन करण्यासाठी युजीसीकडून डी. एस. कोठारी पोस्ट डॉक्‍टरल फेलोशीपही मिळाली आहे. आतापर्यंत त्यांचे तीस आंतरराष्ट्रीय शोधनिंबध प्रसिद्ध झाले आहेत.

राजाराम महाविद्यालयात कार्यरत
संशोधनानंतर भारतात परतल्यावर त्यांनी ‘एमपीएससी’ची परीक्षा दिली. या परीक्षेत यश मिळवत त्यांची मुंबईतील एलफिस्टन महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. सध्या त्या कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयात कार्यरत आहेत.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new method treatment of cancer Research by dr Ashwini Bhagwanrao Salunkhe kolhapur letest news medical news