जरळीतील चिमुकलीचा विहिरीत बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 April 2020

जरळी (ता. गडहिंग्लज) येथे एका चिमुकलीचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. अमृता काकासाहेब पांढरे (वय 9) असे तिचे नाव आहे. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने जरळीसह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

नूल : जरळी (ता. गडहिंग्लज) येथे एका चिमुकलीचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. अमृता काकासाहेब पांढरे (वय 9) असे तिचे नाव आहे. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने जरळीसह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

याबाबतची माहिती अशी, जरळी-शिंदेवाडी रोडवरील शेतवडीत असलेल्या पांढरे वसाहतीत काकासाहेबांचे घर आहे. आज सकाळी त्यांनी अमृता व मुलगा आर्यनला सोबत घेवून जळाऊ लाकडे आणण्यासाठी शेताकडे गेले होते. त्यानंतर काकासाहेब दोन्ही मुलांना सोबत घेवून शेजारीच असलेल्या मुगळी हद्दीतील तानाजी कुंभार यांच्या विहिरीत पोहण्यासाठी गेले. अमृताला पोहता येत नसल्याने तिला डबा बांधला होता. पोहून परत येताना अमृताने बांधलेला डबा सोडून विहिरीच्या कठड्यावर टाकताना तिचा तोल गेला आणि ती पाण्यात पडली.

दरम्यान, काकासाहेब व आर्यन काही अंतर चालत पुढे आले होते. त्याचवेळी मागे पाहून अमृता कुठे दिसत नसल्याचे आर्यनने वडीलांना सांगितले. त्यानंतर काकासाहेब यांनी क्षणाचाही विलंब न लावता धावत जावून विहिरीत उडी घेतली. परंतु अमृता हाती लागली नाही. यामुळे काकासाहेब यांनी ओरड केली. शेजारचे लोक गोळा झाले. सर्वांनी मिळून विहिरीतील पाण्यात शोध घेवून अमृताला बाहेर काढले. तोपर्यंत तीचा बुडून मृत्यू झाला होता.

चिमुकल्या अमृताचा मृतदेह पाहून काकासाहेब, आई व आजीने केलेल्या आक्रोशाने उपस्थितांचे काळीज पिळवटून गेले. घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा केला. काकासाहेब पांढरे यांनी पोलिसात फिर्याद दिली. जरळी प्राथमिक शाळेत अमृता दुसरीच्या वर्गात शिकत होती. तिचे आई-वडील शेती करतात. मुगळी हद्दीलगतच पांढरे यांची शेती आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine year girl's Drowning death Kolhapur Marathi News