नितीन जांभळे यांच्या ‘०५५५’चा बोलबाला

संदीप खांडेकर
Monday, 5 October 2020

अशोकराव जांभळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते. आमदार असताना त्यांनी कधीही नंबरचा हट्ट धरला नव्हता.

 कोल्हापूर  : माजी आमदार अशोकराव जांभळे इचलकरंजीचे. ते विधान परिषदेचे १९९१ ते ९७ पर्यंतचे आमदार. त्यांचा मुलगा नितीन जांभळे इचलकरंजी नगरपालिकेचे नगरसेवक. सलग तिसऱ्यांदा त्यांची नगरसेवकपदी वर्णी लागली. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष. समाजकारणातून ते राजकारणात आले. उद्योजक म्हणूनही त्यांची ख्याती आहे. त्यांच्या गाड्यांच्या ०५५५ क्रमांकात बदल झालेला नाही. घरात आलेल्या पहिल्या गाडीचा तो नंबर. नव्या गाड्यांसाठी त्याचा हट्ट धरला जातो. मतदारांसह कामगारवर्गात या नंबरचा बोलबाला आहे. परिणामी तो बदलण्याचा विचार जांभळे कुटुंब करत नाही. 
 

नितीन जांभळे यांच्याकडे चारचाकी गाडी २०१०ला आली. तिचा नंबर ०५५५ घेतला. त्यांचे वडील अशोकराव जांभळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते. आमदार असताना त्यांनी कधीही नंबरचा हट्ट धरला नव्हता. नव्या गाडीच्या नंबरने कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले. गाडीचा नंबर त्यांच्या डोक्‍यात बसलाय. नितीन जांभळे यांनी राजकारणात दहावीला असताना पाऊल ठेवले. ते वाणिज्य शाखेचे विद्यार्थी. मित्रपरिवाराने त्यांच्या नेतृत्वाची चुणूक अनुभवली होती. याच परिवारात त्यांच्या नंबरचा गाजावाजा झाला. जांभळे २००५ मध्ये नगरसेवक झाले. समाजकारणातून राजकारणातला त्यांचा प्रवास यशस्वी झाला. मतदारांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. दुसऱ्या निवडणुकीतही त्यांचे नाणे चालले. विजयाची हॅटट्रिक करण्याचे त्यांचे स्वप्न होते. ते मतदारांनी भंग केले नाही. यशस्वी उद्योजक म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. तसाच त्यांच्या गाड्यांच्या नंबरचाही आहे. जळाऊ लाकडाचे ते व्यापारी आहेत. पेट्रोल पंप चालक, टेक्‍स्टाईलच्या व्यवसायाशी ते निगडित आहेत. अधिकारी व कामगार वर्गात त्यांचा नंबर तोंडपाठ झालाय, हे विशेष.

हेही वाचा- दीड जीबी डाटा संपल्यानंतर विद्यार्थी आऊट ऑफ रेंज! -

समाजकारणाची नाळ त्यांनी तोडलेली नाही. महापुरात त्यांनी जीवनावश्‍यक वस्तूंचे किट महापूरग्रस्तांना पुरविले. कोरोनाच्या महामारीतही त्यांचा सेवाभाव जागरूक राहिला. दहा हजार लोकांना त्यांनी जीवनावश्‍यक वस्तूंचे किट दिले. इचलकरंजीत ज्या चौकातून त्यांच्या गाडीचा प्रवास घडेल तिथल्या लोकांना गाडीच्या नंबरवरून जांभळे यांचे नाव डोळ्यांसमोर येते. बांधकाम व पाणीपुरवठा सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. प्रवासाचा त्यांना कंटाळा नाही. लोकांच्या समस्या असोत अथवा कामानिमित्त; त्यांचे फिरणे थांबत नाही. क्रीडा क्षेत्राशीही त्यांचे अनोखे नाते आहे. त्यांचा नंबर खेळाडूंतही फेमस आहे. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे  संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत जांभळे व त्यांच्या ०५५५ नंबरचे नाते ठाऊक आहे. नंबर लोकांच्या लक्षात राहणारा असल्याने, नव्या गाड्यांसाठी तोच फिक्‍स केल्याचे जांभळे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nitin jambhale vehicle story by sandeep khandekar