
कोल्हापूर ः अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्याविरोधात आज आठ विरूध्द चार मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला. प्रभारी अध्यक्ष म्हणून विद्यमान उपाध्यक्ष धनाजी यमकर यांची निवड झाली आहे. ही सर्व प्रक्रिया कायदेशीर असून येत्या सात दिवसात नूतन पदाधिकारी निवड होईल, अशी माहिती आज महामंडळाचे कार्यवाह, अभिनेता सुशांत शेलार यांनी दिली.
कोल्हापूर ः अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्याविरोधात आज आठ विरूध्द चार मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला. प्रभारी अध्यक्ष म्हणून विद्यमान उपाध्यक्ष धनाजी यमकर यांची निवड झाली आहे. ही सर्व प्रक्रिया कायदेशीर असून येत्या सात दिवसात नूतन पदाधिकारी निवड होईल, अशी माहिती आज महामंडळाचे कार्यवाह, अभिनेता सुशांत शेलार यांनी दिली.
दरम्यान, महामंडळाची निवडणूक अवघ्या काही महिन्यावर आली असताना कार्यकारिणीची सभा झाली. त्यात अठराहून अधिक विषयावर चर्चा होणार होती. मात्र, सभेला सुरवात होताच अविश्वास ठराव दाखल झाला आणि पाच तासाहून अधिक काळ सभा लांबली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील शहाजी कॉलेजच्या सभागृहात कार्यकारिणीची सभा झाली. महामंडळातील धनादेश चोरी, लॉकडाऊन काळातील मदतीवरून झालेले आरोप-प्रत्यारोप या पार्श्वभूमीवर काही वादाचे विषय उपस्थित होणार असल्याने कायदेशीर सल्लागारही सभेला उपस्थित होते. सभा सुरू होताच श्री. राजेभोसले यांच्या मनमानी कारभाराविरोधात अविश्वास ठराव दाखल झाला. ठरावाच्या बाजूने श्री. शेलार यांच्यासह श्री. यमकर, पितांबर काळे, रणजीत जाधव, अभिनेत्री वर्षा उसगांवकर, निकीता मोघे, सतीश रणदिवे, सतीश बिडकर यांनी मतदान केले. श्री. राजेभोसले यांच्या बाजूने खजीनदार संजय ठुबे, शरद चव्हाण, चैत्राली डोंगरे, विजय खोचीकर यांनी मतदान केले.
श्री. राजेभोसले आणि समर्थक संचालकांनी आयत्यावेळी अविश्वास ठराव आणता येणार नाही. ही प्रक्रिया बेकायदेशीर असल्याची भूमिका घेतली. त्यामुळे काही काळ वादही झाला. यावेळी वर्षा उसगावकर आणि विरोधातील संचालकांनी श्री. राजेभोसले यांची संचालकांनी बहुमताने अध्यक्षपदी निवड केली होती. मात्र, त्यांच्या मनमानी कारभाराबाबत त्यांना वारंवार सांगूनही त्यांच्यात बदल होत नसल्याने अविश्वास ठराव आणत असल्याचे सांगितले.
..........
महा कला मंडल कशासाठी ?
राजेभोसले यांच्या कार्यपध्दतीविरोधात अनेक तक्रारी होत्या. अनेक महत्वाचे निर्णय ते स्वतःच घ्यायचे. त्याची इतर संचालकांना कुठलीच माहिती नसायची. आवश्यकता नसताना महा कला मंडलाची त्यांनी स्थापना केली आणि त्यात महामंडळाला दुय्यम स्थान दिले गेले, अशा तक्रारीही यावेळी ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या संचालकांनी व्यक्त केल्या.
..........
प्रक्रिया बेकायदेशीर,
न्यायालयात दाद मागणार ः राजेभोसले
मेघराज राजेभोसले म्हणाले, ""मुळात आजच्या विषय पत्रिकेवर अविश्वास ठरावाचा विषयच नव्हता. आयत्या वेळी हा विषय आणला गेला. ही सर्व प्रक्रिया बेकायदेशीर असून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हा प्रकार घडला आहे. मात्र, महामंडळाचा सर्व कारभार पारदर्शकच आहे आणि सभासद माझ्या बाजूने आहेत. आगामी निवडणुकीत तेच प्रत्येकाला योग्य ती जागा दाखवतील. मी राजीनामा दिलेला नाही. अविश्वास ठरावाविरोधात न्यायालयात दाद मागणार आहे.''
महा कला मंडल या संस्थेची संकल्पनाच अजून काहींना समजलेली नाही. ही संस्था राज्यभरातील कला क्षेत्रातील शिखर संस्था असून त्या माध्यमातून शासनाकडे विविध मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
..........
मनमानी कारभाराविरोधात
संचालक एकवटले ः यमकर
श्री. राजेभोसले यांच्या मनमानी कारभाराला संचालक कंटाळले होते. त्यामुळे अविश्वास ठराव मांडला गेला. त्यांच्या कारभाराविरोधात बोलणाऱ्यांना ते जाणिवपूर्वक कारवाईचा बडगा दाखवत. एक-दोन माणसांनीच संस्था चालवता येत नाही. अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलेल्या संचालकांच्या प्रवास भत्त्याचे धनादेशही सभेनंतर जाणिवपूर्वक दिले गेले नाहीत, असे धनाजी यमकर यांनी सांगितले.
- संपादन ः यशवंत केसरकर