पोलिसांची आता आठ तासाची ड्युटी : डॉ. अभिनव देशमुख

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

गेल्या आठवड्यापासून पोलिस 14 ते 18 तास अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. त्यांचा दररोज हजारो लोकांचा संपर्क येतो. कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलिसांना आवश्‍यक सुविधा पोलिस प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या होत्या.

कोल्हापूर - कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी रस्त्यावर अहोरात्र बंदोबस्त करणाऱ्या जिल्ह्यातील पोलिसांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. त्यांचे आरोग्य चांगले रहावे या उद्देशाने त्यांची ड्युटी आठ तासाची करण्यात आली आहे. पोलिस आता तीन सत्रात आपले कर्तव्य बजावणार आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे पोलिस दलात समाधान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी जनता कर्फ्यूनंतर आता देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळायचा असेल तर गर्दी होऊ नये. अत्यावश्‍यक सेवेत अडथळा निर्माण होणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर येऊन पडली आहे. त्यासाठी गेल्या आठवड्यापासून पोलिस 14 ते 18 तास अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. त्यांचा दररोज हजारो लोकांचा संपर्क येतो. कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलिसांना आवश्‍यक सुविधा पोलिस प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या होत्या. आरोग्याबाबत काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांना वारंवार दिल्या जात आहेत. तरही कोरोना विरोधातील लढा हा एकदोन दिवसाचा नाही तर तो दिर्घकाळ चालणार आहे. त्यासाठी पोलिसांना आणखी बरेच दिवस कडक उन्हासह रात्रीचा बंदोबस्त पार पाडावा लागणार आहे. हे कर्तव्य पार पाडण्यासाठी पोलिसांचे आरोग्य चांगले राहीले पाहीजे. याचा विचार करून पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यातील पोलिसांची ड्युटी आठ तासाची करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पोलिसांना आता तीन सत्रात काम करावे लागणार आहे. यातून पोलिसांचा ताण कमी होऊन त्यांना पुरेसी विश्रांती मिळू शकेल. त्यातून ते निरोगी राहतील व दिलेले कर्तव्य सक्षमपणे पूर्ण करू शकणार आहेत. 

दृष्टीक्षेपात...

जिल्ह्यातील पोलिस ठाणी - 31 

जिल्ह्यातील पोलिस कर्मचारी - 2866

अधिकारी - 185 

तीन सत्रात काम 

सकाळी 7 ते दुपारी 3 
दुपारी 3 ते रात्री 11 
रात्री 11 ते सकाळी 7 

पोलिसांना दिर्घकाळ बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. कामाचा ताण कमी होऊन त्यांना पुरेसी विश्रांती मिळावी. त्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी जिल्ह्यातील पोलिसांची आठ तासाची डयुटी करण्यात आली आहे.
डॉ. अभिनव देशमुख (पोलिस अधीक्षक) 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: now police duty of Eight hours