"आता काय हा कोरोना आला...?' 

"Now what is this corona ...?"
"Now what is this corona ...?"
Updated on

कोल्हापूर : राधानगरी धरणाचे कौतुक फार होतं आणि कौतुक करण्यासारखं ते कामही आहे. या धरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील बांधकामाचा एक साक्षीदार नव्हे, तर चक्क बांधकामावर आठ आणे मजुरीवर काम करणारा एक चाचा आजही आहे. बांधकामाच्या अखेरच्या टप्प्यातलं सारं चित्र या चाच्यांच्या डोळ्यांसमोर आजही आहे. धरणापासून काही अंतरावरच इब्राहिमवाडीत या चाच्यांचे वास्तव्य आहे. नितळ पाणी, निखळ वारं यावर जगलेल्या या चाच्यांना ताप-थंडी कधी माहीत नाही; पण कोरोनाच्या संसर्गाची अनामिक भीती या चाच्यांवर आणि त्यांच्या छोट्या वाडीवर आहे. 
दाऊदवाडी आणि इब्राहिमवाडी अशा दोन वाड्या राधानगरी धरणाजवळ आहेत. या दोन्ही वाडीतले पूर्वीचे लोक धरणाच्या बांधकामावर मजूर होते. धरण बांधून झाले आणि ते तेथेच वस्ती करून राहिले. आज त्यातले रजाक इब्राहिम तांबोळी (वय 95) हे एकमेव साक्षीदार आहेत. त्यांच्या वाडीचे नाव दाऊदवाडी व इब्राहिमवाडी. अलीकडच्या काळात त्या दाऊद इब्राहिममुळे या दोन्ही वाड्यांची नावे ऐकून लोक वेगळ्या नजरेने बघतात; पण या दोन्ही वाड्या राधानगरी धरण बांधणाऱ्या हातांच्या कुटुंबीयांच्या आहेत. कोरोना संचारबंदीचे सावट या दोन्ही वाड्यांवर आहे. हवा, पाणी, अन्नधान्य यात एक टक्‍काही प्रदूषणाचा अंश नसलेल्या या वाड्या; पण कोरोनाची चिंता आता या गावावर पसरली आहे. लवकर एकदा कोरोना जाऊ दे, एवढीच सर्वांची इच्छा आहे. 
या वाड्यांत बहुतेक लोकांची आडनावे तांबोळी. राधानगरी धरणाच्या कामावर दाऊद तांबोळी व इब्राहिम तांबोळी हे भाऊ होते. त्यांच्या नावाने त्या त्या परिस्थितीत या दोन वाड्या वसल्या. आता त्यांची पाचवी पिढी तेथे राहत आहे. रजाक तांबोळी (वय 95) हे या वाडीतले सर्वात ज्येष्ठ. ते राधानगरी धरणाचे काम मध्येच कसे थांबले होते, ते राजाराम महाराजांनी कसे पूर्ण करून घेतले, त्या कामात आपण आठ आणे, रुपया मजुरीवर कसे होतो, ते मनापासून सांगतात. त्याहीपेक्षा या धरणाने शेती हिरवीगार केली आणि नितळ पाण्याने लोकांच्या तब्येती चांगल्या झाल्या, असे ते आवर्जून सांगतात. राधानगरी परिसर धरणाचे पाणी, स्वच्छ हवा यामुळे कसा निरोगी आहे, हे हसून सांगतात. पण आता काय हा कोरोना आला? कोठून आला? असा प्रश्‍न आकाशाकडे तोंड करून विचारतात. 


वाड्या-वस्त्यांवर निव्वळ सन्नाटा 
राधानगरी परिसरातले अनेक लोक मुंबईत कामाला. तांबेवाडी या गावातली बहुतेक तरुण मुले मुंबईत. गावात फक्त ज्येष्ठ नागरिक आणि शिमग्याच्या सणाला येऊन गावातच अडकून पडलेले काही जण एवढीच पुरुष मंडळी. या गावातले सर्व तरुण मुंबईतच अडकले आहेत. त्यांचे फोन येतात. फोनवरूनच ख्यालीखुशाली सांगतात; पण या पोरांनी गावाकडे यावे, चटणी, मीठ-भाकर खाऊन सर्वांनीच एकत्र राहावे, एवढीच प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठांची इच्छा आहे. कोरोनाचे नाव घ्यायलाही भीती वाटते, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे वाड्या-वस्त्यांवर निव्वळ सन्नाटा आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com