कोल्हापूर अर्बन बॅंकेची दीड कोटीची फसवणूक ; तिघांविरोधात गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 January 2021

कोल्हापूर अर्बन बॅंक गांधीनगर शाखेची दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे

उजळाईवाडी (कोल्हापूर) : उद्योग उभारणे व मशिनरी खरेदीची बोगस कोटेशन सादर करून कोल्हापूर अर्बन बॅंक गांधीनगर शाखेची दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बाळासो चंद्राप्पा पाटील, आनंदा बाळासो पाटील (दोघे रा. कागले माळवाडी, गोकुळ शिरगाव ता. करवीर ) व भरत कुमार जैन प्रोप्रा. मे. भाग्यलक्ष्मी इंडस्ट्रिज (रा. ३६१/८ मेन, सेकंड स्टेज, पेंनाई इंडस्ट्रियल इस्टेट, बेंगलोर कर्नाटक ) अशी गुन्हा दाखल झोलेल्यांची नावे आहेत.  

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संशयित बाळासो पाटील व आनंदा पाटील यांचा गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये कारखाना आहे. या कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी त्यांनी कोल्हापूर अर्बन बॅंकेच्या गांधीनगर शाखेकडे कर्जाचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावामध्ये उद्योगाचे  विस्तारीकरण करण्यासाठी नवीन सीएनसी व व्हीसीएमसी मशिनची आवश्‍यकता असून, सदर मशिनचे कोटेशन भरत कुमार जैन यांचेकडून घेऊन ते एप्रिल २०१९ मध्ये बॅंकेला सादर केले होते. त्यावर बॅंकेने मशिनरी खरेदी करण्यासाठी संशयितांना दीड कोटी रुपयांचे कर्ज दिले होते, परंतु सदर कर्जाच्या रकमेचा विनियोग मशिनरी खरेदी करण्यासाठी न करता वैयक्तिक कारणासाठी करीत पैशाचा अपहार केल्याचे बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

हेही वाचा - अपघातात मायलेकरावर काळाचा घाला -

बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व  शाखाधिकारी गौरव पाटील यांनी चौकशी केली असता कोटेशनप्रमाणे कोणतीही नवी मशिनरी त्यांच्या उद्योगाच्या ठिकाणी आढळून आली नाही. यावरून सादर केलेली कोटेशन्स खोटी व बनावट असल्याचे समोर आले. यामध्ये भरतकुमार जैन यांचाही सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे. सर्व कायदेशीर कारवाई पूर्ण करीत बाळासो पाटील, आनंदा पाटील व भरतकुमार जैन या तिघांविरोधात गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यांमध्ये शाखाधिकारी गौरव विजय पाटील (रा. गुलाब गल्ली, मंगळवार पेठ कोल्हापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण हे तपास करीत आहेत.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one business man fraud with kolhapur urban bank rupees one and half crore