आठवड्यातील एक दिवस जंगलातील प्लॅस्टिक कचरा गोळा  करण्यासाठी 

निवास मोटे 
मंगळवार, 7 जुलै 2020

रविवारी किंवा सुटीच्या दिवशी हे तरुण थेट या डोंगर पठारावर जातात.

जोतिबा डोंगर - आठवड्यातील एक दिवस आपल्या कामातून चार पाच तास वेळ काढायचा आणि थेट जंगल डोंगर-दऱ्या पठारे  गाठायची. तेथे पडलेला सर्व प्लॅस्टिक कचरा गोळा करायचा. तो एकत्र करून पोत्यात भरायचा आणि गावात आणून भंगार वाल्यांना मोफत द्यायचा. आपल्या भागातील निसर्ग वाचला पाहीजे, त्याचे संर्वधन झाले पाहीजे. यासाठी पोहाळे  तर्फ  आळते (ता. पन्हाळा) या गावातील पंधरा विस निसर्ग मित्र तरुण हे आगळे वेगळे काम  करित आहेत. 

कोल्हापूर पासून चौदा पंधरा किलोमीटर अंतरापासून पुढे गेले की पोहाळे गिरोली ज्योतिबा डोंगर सादळे मादळे या भागातील डोंगर-पठारे लागतात. या ठिकाणी हा परिसर हिरवागार सौंदर्याने नटलेला आहे. या परिसरातून थेट संपूर्ण कोल्हापूरचे दर्शन होते तसेच पन्हाळागड, वारणा कोडोली परिसरही स्पष्ट दिसतो. 
या डोंगर पठारावर शनिवार रविवारच्या  सुट्टीच्या दिवशी फोटोग्राफी, स्नेहभोजन सेल्फी फोटो तसेच ओपन बारसाठी ही गर्दी होते. येणारे पर्यटक प्लॅस्टिक कचरा टाकून जातात. बाटल्या फोडून काचा करतात. त्यामुळे दिवसेंदिवस हा परिसर प्लॅस्टीक कचरामय होत आहे. या परिसरातील निसर्गास बाधा येऊ लागल्याने येथील पर्यावरण निसर्गप्रेमी तरूणांनी चंग बांधला आणि निदान आठवड्यातील एक दिवस खास निसर्ग राखण्यासाठी ठेवण्याचा संकल्प केला आहे.

रविवारी किंवा सुटीच्या दिवशी हे तरुण थेट या डोंगर पठारावर जातात. पडलेला सर्व प्लॅस्टीक कचरा पोत्यात गोळा करतात आणि तो गावात आणतात. या डोंगर पठारावर आलेल्या पर्यटकांना हे तरुण सांगतात, की हा निसर्ग आमचा आहे. त्याला बाधक असे वर्तन करू नका, येथे या खेळा बागडा आनंद लुटा पण किळसवाने प्रकार करू नका.

या भागात गेल्या चार पाच वर्षापासून निसर्ग संवर्धनाची चळवळ तरुण वर्ग, शिक्षक निसर्गप्रेमी यांनी सुरू केली असून  जनजागृती करण्याचे काम  केले आहे.

दरवर्षी हे निसर्ग मित्र तरुण जुलै-ऑगस्ट महिन्यात नेचर वॉक सारखे उपक्रम घेत असतात. प्रसिद्ध निसर्ग अभ्यासक, वनस्पती तज्ञ डॉ. मधूकर बाचूलकर डॉ. वाली यांना थेट या परिसरात आणतात व  येथील निसर्ग  पर्यावरण, संवर्धन विविध झाडे, प्राणी पशू पक्षी याची माहिती घेतात. यापूर्वी त्यांनी निसर्ग मित्र अनिल चौगले यांना आणून सापां विषयी समज गैर समज हा कार्यक्रम घेतला. पक्षीमित्र दिलीप पाटील यांना आणून या भागात असणारे १०८ प्रकारच्या विविध जातीचे पक्षांचे निरिक्षण त्यांनी केले आहे. 
सुरेश बेनाडे चंद्रकांत निकाडे  भिवाजी काटकर, शिवाजी मिसाळ,  बाबासो गुरव, केदारी बोरचाटे, नानासो पाटील, अमोल बोरचाटे संग्राम गायकवाड, धनाजी पोवार, रमेश बोरचाटे के. एन. पाटील, बळी मिसाळ, सूरज मोटे, महेश चौगले, संग्राम साळोखे, सुनिल साळोखे तसेच परिसरातील इतर निसर्गमित्र या उपक्रमासाठी परिश्रम घेत आहे.

हे पण वाचा - व्हिडीओ : गरीब मराठा समाजाचे आरक्षण टिकवणे म्हणजे... 

 

या परिसरातील निसर्ग अबाधीत राखण्याची सर्वांची जबाबदारी आहे. पर्यटकांनीसुध्दा प्लॅस्टीक कचरा करू नये. तुमचा कचरा आम्हाला काढावा लागतो. आठवड्याला तीन चार पोती प्लॅस्टीक कचरा निघतो. माणसांप्रमाणे पशुपक्षी जगला पाहीजे. 

-शिवाजी मिसाळ, निसर्ग मित्र,पोहाळे तर्फ आळते ता.पन्हाळा )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One day a week to collect plastic waste in the forest in kolhapur