
तोतया पोलिसाने वृद्धाला लुबाडण्याचा असा पहिल्यांदाच प्रकार घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली.
गारगोटी (कोल्हापूर) : गारगोटी-गडहिंग्लज मार्गावर घुगरे मोटार गॅरेजसमोर पोलिस असल्याची बतावणी करून निवृत्त शिक्षकाकडील साडेतीन तोळे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले. आठवडे बाजारादिवशी ही घटना घडली. तोतया पोलिसाने वृद्धाला लुबाडण्याचा असा पहिल्यांदाच प्रकार घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली.
येथे आठवडा बाजार होता. बाजार व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंजूबाई मंदिराजवळ पोलिसांनी नाकाबंदी केली होती. येथील सावंत कॉलनीतील निवृत्त शिक्षक पी. एल. कांबळे दुपारी बाराला बाजार करून घरी जात होते. ते गारगोटी-गडहिंग्लज रस्त्यावरून जात असताना घुगरे मोटार गॅरेजनजीक अनोळखीने अडवून आपण पोलिस असल्याचे सांगितले.
हेही वाचा - मुंडण केल्याने आले नैराश्य अन् थेट न्यायालयाच्या आवारात पेटवून घेण्याचा केला प्रयत्न -
पोलिसांची नाकाबंदी असून, तुमची तपासणी झाली नाही का, असा सवाल करून हातरूमालाची अज्ञाताने मागणी केली. त्या शिक्षकांनी हातरूमाल काढून त्याच्याकडे दिला असता हातरूमालमध्ये अंगठी टाका, असे सांगितले, तसेच गळ्यातील चेन काढण्यास सांगितले. या वेळी खिशातील पैशांची चिल्लरही शिक्षकाने टाकली. त्यानंतर चोरट्याने रूमालास गाठ मारून रूमाल बाजाराच्या पिशवीत टाकल्याचे दर्शविले.
घरात गेल्यावर बाजाराच्या पिशवीतील सोन्याची पाहणी केली असता चेन व अंगठी आढळली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठले आणि फिर्याद दाखल केली. घटनेची माहिती समजताच सायंकाळी अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी भेट दिली. दुपारी घटना घडूनही पोलिस याबाबत माहिती देत नव्हते. यामुळे नेमकी वस्तुस्थिती समजत नव्हती.
हेही वाचा - आता गावातील राजकारण तापणार ; ग्रामपंचायत निवडणुकांच बिगुल लवकरच वाजणार ? -
संपादन - स्नेहल कदम