कदाचित आज माझा शेवटचा दिवस आहे, आता मी तुम्हांला पुन्हा त्रास देणार नाही म्हणत मित्रांना केला मेसेज अन् संपवली जीवनयात्रा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 January 2021

एक संदेश त्याने घरी आणि काही मित्रांना मोबाईल वरून पाठवले होते. 

वाळवा (सांगली) : पुणे येथे नोकरीसाठी मुलाखत देऊन येतो, असे सांगून घरातून बाहेर पडलेला येथील प्रसिद्ध व्यावसायिक आणि तरुण अभियंता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. विशेष म्हणजे आज कदाचित माझा शेवटचा दिवस आहे, माझा तुम्ही खूप त्रास सहन केला, आता मी तुम्हांला पुन्हा त्रास देणार नाही..., असा संदेश त्याने घरी आणि काही मित्रांना मोबाईल वरून पाठवले होते. 

राहुल बाजीराव नायकवडी (वय ३५, रा. वाळवा पेठभाग) असे त्याचे नाव आहे. गावापासून सुमारे पंधरा किलोमीटर दूर निर्जन ठिकाणी त्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. काल सकाळी अकराच्या सुमारास प्रसिद्ध मल्लिकार्जुन डोंगराच्या पायथ्याशी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी कुरळप पोलिसांत आर्थिक नैराश्‍यातून राहुलने जीवनयात्रा संपवली अशी नोंद आहे. राहुल नायकवडी हा तरुण इंजिनिअर होता. 

हेही वाचा -  तरुणाच्या खूनप्रकरणी पाच जणांना जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली

नोकरी न करता तो घरच्या टिंबर आणि सिमेंट विक्री व्यवसायात घरच्यांना मदत करत होता. नैराश्‍यातून राहुलने यापूर्वीही विष प्राशन केले होते. काल तो पुण्याला जातो असे सांगून घरातून बाहेर पडला. त्यानंतर त्याने मोबाईलवरून घरी आणि काही मित्रांना मेसेज पाठवले. मेसेज आणि त्यातील गांभीर्य ओळखून मित्रांनी त्याला शोधण्यासाठी मोठे प्रयत्न केले. मोबाईलवर राहुल वेगवेगळी ठिकाणे सांगत होता. रात्री उशिरापर्यंत शोधाशोध झाली. पण त्यात यश आले नाही. दरम्यान, काल सकाळी येडेनिपाणी भागातील मल्लिकार्जुन डोंगराच्या पायथ्याशी झाडाला तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली.

पाहणाऱ्यांनी याची माहिती सरपंच डॉ. अमोल पाटील यांना कळवली. डॉ. पाटील यांनी कुरळप पोलिसांत याबाबत माहिती दिली. प्राथमिक चौकशीत आत्महत्या करणारा हा राहुल नायकवडी असल्याचे स्पष्ट झाले. राहुलचे मामा बाजीराव पाटील रा. कामेरी यांनी पोलिसांत आर्थिक नैराश्‍यातून राहुलने आत्महत्या केली अशी वर्दी दिली. सहायक पोलिस उपनिरीक्षक बी. बी. घस्ते तपास करत आहेत. राहुलच्या मागे शिक्षक वडील, आई, पत्नी दोन लहान मुले, बहीण आहे. राहुल हा प्रतिथयश व्यावसायिक म्हणून ओळखला जात होता.

हेही वाचा - अपघातात मायलेकरावर काळाचा घाला -

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one young engineer person attend a suicide in sangli