ऑनलाईन एक रुपया अकौंटवर पाठवला अन आम्ही फसलो पण तुम्ही राहा दक्ष...

राजेश मोरे
रविवार, 28 जून 2020

 एक रुपयाचे ऑनलाईन पेमेंट केले. बस्स काही मिनिटांत त्यांच्या बॅंक अकौंटवरून २२ हजार रुपये ट्रान्स्फर झाल्याचा संदेश त्यांना आला.

कोल्हापूर - ऑनलाईन पैशाचे व्यवहार करणाऱ्या कंपनीच्या लोगोची हुबेहूब नकलेची लिंक नामवंत डॉक्‍टरांच्या मोबाईलवर भामट्याने पाठवली. त्याने ‘केवायसीच्या त्रुटी दूर करायच्या आहेत’, असा फोन केला. त्यावर विश्‍वास ठेवून डॉक्‍टरांनी ती लिंक डाऊनलोड करून पूर्तता केली. काहीवेळाने भामट्याने फोन करून ‘तुमचा कार्ड व पिन क्रमांक कोणाला सांगू नका. फक्त ऑनलाईन एक रुपया अकौंटवर पाठवा. बस्स तुमची ऑनलाईन सिस्टीम पुन्हा सुरू होईल,’ असे सांगितले. त्यानुसार डॉक्‍टरांनी त्यावर एक रुपयाचे ऑनलाईन पेमेंट केले. बस्स काही मिनिटांत त्यांच्या बॅंक अकौंटवरून २२ हजार रुपये ट्रान्स्फर झाल्याचा संदेश त्यांना आला. हे बंगरूळ येथील सायबर सेलच्या लक्षात आले. त्यांनी डॉक्‍टरांच्या परवानगीने ते कार्ड ब्लॉक केले. त्यामुळे त्यांच्या खात्यावरील तीन लाख रुपये सुरक्षित राहू शकले. बॅंक खाते व इतर माहिती स्कॅन करून भामट्याने हा गंडा घातला. आम्ही फसलो, पण तुम्ही दक्ष राहा... असे आवाहन डॉक्‍टर मित्रपरिवारांना करत आहेत.

वाचा - केंद्राच्या निधीच्या व्याजावर राज्याचा डोळा... पण सरपंच म्हणतात देणार नाही...

गंडा घालणाऱ्या भामट्यांबरोबर अफवा, रोगराईबद्दल भीती पसरविणारे, तेढ निर्माण करणारे संदेश व्हायरल होण्याचे धोके वाढले आहेत. परदेशातूनही व्हायरल झालेल्या आक्षेपार्ह २१ पोस्टचा पर्दाफाश कोल्हापूर सायबर पोलिस ठाण्याने केला. लॉकडाउन काळात सायबर क्राईम संबंधीच्या ५१ गुन्ह्यांचा छडा लावला. लोकांच्या प्रबोधनासाठी पोलिस ठाण्यातर्फे गर्दीच्या ठिकाणी, शासकीय कार्यालये, बॅंका, पोलिस ठाणी आदी ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत.  

ही खबरदारी घ्या...

  • ओटीपी क्रमांक कोणालाही देऊ नका
  • ऑनलाईन व्यवहारासाठी पासवर्डमध्ये विविधता ठेवा
  • स्मार्ट फोनला पासवर्ड ठेवा
  • महत्त्वाची माहिती मोबाईलमध्ये ठेवू नका
  • लॉटरी, बक्षीसबाबतच्या ईमेल कॉलकडे दुर्लक्ष करा
  • भडकावू संदेश, व्हिडिओ, छायाचित्रे फॉरवर्ड, लाईक, शेअर करू नका
  • अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका
  • ऑनलाईन खरेदीपूर्वी संकेतस्थळाची पडताळणी करा

दृष्टिक्षेपात...
 

सायबर क्राईमचे दाखल गुन्हे

         वर्ष         दाखल        उघड

  • २०१९       ६            २
  • २०२०       १०          ४

लॉकडाउन काळात ७२ गुन्ह्यांचा छडा
 

ऑनलाईन व्यवहाराची माहिती असल्याखेरीज व्यवहार करू नका. कोणतीही वस्तू ऑनलाईन स्वस्त मिळत असेल तर त्यावर पटकन विश्‍वास ठेवू नका.  
- संजय मोरे,
पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: online money fraud and care about on